भोंगवलीत सापडली विष्णूची दुर्मीळ मूर्ती

भोंगवलीत सापडली विष्णूची दुर्मीळ मूर्ती

पुणे - भोर तालुक्‍यातील भोंगवली गावातील शेतात पेशवाईच्या अखेरच्या काळातील भगवान विष्णूची दुर्मीळ मूर्ती भारत इतिहास संशोधन मंडळाला मिळाली आहे. ही मूर्ती दुर्मीळ असल्याचे पुरातत्त्व तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

ही मूर्ती राजस्थानी कारागिरांनी सन १७५० ते १८०० या कालावधीत घडवली असावी, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भोंगवलीतील रहिवासी अमित सबनीस यांच्या खासगी मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून ही मूर्ती होती. काही दिवसांपूर्वी ही मूर्ती भग्न पावल्यामुळे सबनीस यांनी ती शेतात नेऊन ठेवली होती. या मूर्तीबाबत माहिती मिळताच मंडळाने ती जतन करण्यासाठी ताब्यात घेतली आहे. या मूर्तीची डागडुजी केली जाणार असून, ती जतन करण्यासाठी विशेष प्रक्रिया केली जाणार आहे. ही मूर्ती ऐतिहासिक वारसा म्हणून मंडळाच्या संग्रहालयात ठेवली जाणार आहे. नागरिकांना पाहण्यासाठी ती खुली केली जाणार आहे. 

याबाबत इतिहास संशोधक मंडळाचे विश्‍वस्त डॉ. सचिन जोशी म्हणाले, ‘‘या मूर्तीत मानवाकृती गरुडाच्या खांद्यावर भगवान विष्णू बसले आहेत. त्यांच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी आहे. तर एका हातात पद्म, दुसऱ्या हातात शंख, तिसऱ्या हातात गदा आहे. पुणे जिल्ह्यात या पद्धतीची रचना असलेल्या मोजक्‍याच मूर्ती आहेत. पुण्यात या प्रकारच्या तीन मूर्ती असून, सासवडजवळील सोनोरी येथील भुईकोट किल्ल्यातही अशा प्रकारची एक मूर्ती आहे.’’ 

नागरिकांना अशा प्रकारच्या पुरातन मूर्ती किंवा वस्तू सापडल्यास त्यांनी मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. जोशी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com