
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी करून, या निषेधार्थ वडार समाजाच्या वतीने येरवडा पोलीस स्टेशनला घेराव घालण्यात आला.
Crime News : मृत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांचा पोलीस स्टेशनला घेराव
विश्रांतवाडी - येरवडा भागातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी करून या निषेधार्थ वडार समाजाच्या वतीने येरवडा पोलीस स्टेशनला घेराव घालण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच मयतावर संध्याकाळी अंत्यसंकार करण्यात आले.
या घटनेत अस्मिता परशुराम धोत्रे (वय 17 वर्षे, रा. खराळवाडी, पिंपरी चिंचवड) असे बलात्कार करून खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत अस्मिता ही खराळवाडी परिसरात राहत होती. मयताचे चुलते काळुराम धोत्रे यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी रात्री 10 च्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती अस्मिताला गाडीवर घेऊन गेला होता. मात्र रात्री दोनच्या सुमारास मयताची बहीण व आईस शास्त्रीनगर येथील एका खाजगी रुग्णलयातून फोन आला की, तुमच्या मुलीला रुग्णालयात दाखल केले असून, तिने हाताची नस कापले असल्याचे कळविण्यात आले होते. यावेळेस मयताची आई, बहीण व चुलती समक्ष रुग्णालयात हजर झाल्यावर मयताच्या अंगावर पूर्णपणे कपडे नव्हते. तर तिला लाल रंगाच्या चारचाकीमधून शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. त्यावेळेस अनोळखी व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, या मुलीने चौथ्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टरांनी मुलीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले होते. यावेळेस अज्ञात व्यक्तीने स्वतःचा मोबाईल नंबर व पत्ता न देताच घटनास्थळापासून पलायन केले होते. हा सर्व प्रकार कल्याणीनगरमधील सोसायटीत घडल्याचे समजते. ज्यावेळेस अल्पवयीन मुलगी मरण होण्याच्या अगोदर रुग्णालयात तीन अनोळखी महिला सदर घटनास्थळी हजर असल्याचे तिच्या बहिणीने सांगितले. अल्पवयीन मुलगी मयत झाल्यावर तिच्या रुग्णालयाचा पूर्ण खर्च पावणेदोन लाख रुपये आला होता. एका नगरसेवकाच्या मदतीने असलेले बिल कमी करून ते एक लाख रुपये करण्यात आल्यांनतर मयतासह तिच्या नातेवाईकांच्या अल्पवयीन मयतास ताब्यात देण्यात आली होती. यावेळेस येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.
मात्र मयत ही अर्धनग्न अवस्थेत असल्याने तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय तिच्या नातेवाईकांना आल्यावर याविरोधात वडार पँथर संघटनेचे दयानंद इरकल, सामाजिक कार्यकर्ते अशोक इटकर, बसपाचे दिलीप कुसाळे, जनार्दन कुसाळे यांच्यासह वडार समाजातील नागरिकांनी मृतदेहासह येरवडा पोलीस ठाण्याला दुपारी 12 वाजल्यापासून तीन तासाहून अधिक काळ घेराव घातला होता. यावेळेस परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यादरम्यान मयताच्या नातेवाईकांचा आक्रोश हंबरड्यासह परिसर हादरून गेला होता. आरोपीना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा या समाजाने घेतल्यावर येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच मृतदेह हलविण्यात आला. यावेळेस पोलिसांनी जतष शाही (रा. नेपाळ) या संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून त्याचे साथीदार जॉन करियल (रा. केरळ) व राजेश कावळे (रा. मुंबई) हे दोन आरोपी फरार असल्याचे समजत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. व सायंकाळी मृतदेहावर अंत्यसंकार करण्यात आले.
सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
उच्चभ्रू सोसायटीमधील युवक हे अल्पवयीन मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना अशा प्रकारात ओढण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे समाजातील गोरगरीब मुलीदेखील अमिषाला बळी पडून अशा आरोपीच्या शिकार होत असल्यामुळे व संबंधित घटनेमुळे मोठे सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात दयानंद इरकल म्हणाले की, याविरोधात मागासवर्गीय समाजाने आवाज उठविला नसता तर अस्मिता हिस न्याय मिळू शकला नसता. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणार्या नराधमांना कडक कारवाई होणे काळाची गरज असून, अन्यथा याविरोधात आवाज उठवू .
काळाचा दोघांवर घाला
मयत अस्मिता हिच्याबरोबर ज्या मुलाचे लग्न ठरले होते. त्या मुलाला संबंधित घटनेची माहिती समजल्यावर त्यानेदेखील आत्महत्या केली असल्याचे समजत आहे. यामुळे लग्नाअगोदरच या युवक युवतीवर काळाने घाला घातल्याची चर्चा परिसरात सुरू होती.