पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

विश्रांतवाडी - येरवडा-विमानतळ रस्त्यावर विविध सरकारी कार्यालये आहेत. गोल्फ क्‍लब चौक परिसरात शाळा आहेत. तसेच लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी या उपनगरांना जोडणारा हा रस्ता वर्दळीचा असतो. मात्र, अवजड वाहतूक आणि भरधाव वाहनचालकांमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. 

विश्रांतवाडी - येरवडा-विमानतळ रस्त्यावर विविध सरकारी कार्यालये आहेत. गोल्फ क्‍लब चौक परिसरात शाळा आहेत. तसेच लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी या उपनगरांना जोडणारा हा रस्ता वर्दळीचा असतो. मात्र, अवजड वाहतूक आणि भरधाव वाहनचालकांमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. 

अवजड वाहतुकीमुळे गेल्या आठवड्यात एका पन्नासवर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. शिवाय येथे वारंवार अपघात होत आहेत. या रस्त्यावर खड्डे असून, त्याची दुरुस्ती होत नाही. या रस्त्याच्या कडेला पाइप पडून आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली आहे. त्यामुळे दुचाकी वाहने घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. खड्डे बुजवण्यासाठी खड्ड्यांमध्ये भर टाकली तरी त्यावर डांबर टाकले जात नाही. त्यामुळे ती खडी रस्त्यावर पसरते.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. शास्त्रीनगरकडून गोल्फ क्‍लबकडे जाणारा रस्ता अरुंद आहे. गोल्फ क्‍लब चौकात पादचारी रस्ता खराब असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याशेजारी आयटी पार्कच्या इमारतीचे काम चालू आहे. तेथील रस्त्यावर खडी, वाळू पडलेली असते. रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. शास्त्रीनगर ते गोल्फ क्‍लब चौक या रस्त्यावर अनधिकृत स्टॉल आहेत. रस्त्याकडेला वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे अवघड जाते.

चौकामध्ये महापालिका आयुक्तांनी इतर अधिकाऱ्यांसह गेल्या महिन्यात भेट दिली होती. सुरक्षित वाहतुकीच्या उपाययोजनांसाठी वाहतूक विभागातील वरिष्ठांशी विचारविनिमय करण्यात आलेला आहे. यात वाहतूक नियंत्रक दिव्यांची वेळ बदलावी, शास्त्रीनगरकडून गोल्फ क्‍लबकडे येणाऱ्या रस्त्याची रुंदी वाढवविण्यात यावी, असे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. मागील आठवड्यात भाग्यश्री नायर या अपघातात मृत्यू झालेल्या युवतीच्या कुटुंबीयांना शक्‍य ती मदत करण्यात येईल.
- जगदीश मुळीक, आमदार

या रस्त्यावर डंपर व जड वाहनांना सकाळी ८ ते १२ व संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत बंदी आहे. तरी वाळू, सिमेंट घेऊन जाणारे डंपर व मालाची वाहतूक करणारे ट्रक या वेळेत ये-जा करीत असतात. यांना बंदी करण्यात यावी. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार सर्रास घडत आहेत. अशा अवजड वाहनांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल.  
- अश्‍विनी डॅनिअल लांडगे, नगरसेविका 

या रस्त्यावरून अवजड वाहने सतत जात असतात. जवळच अनेक शाळा आहेत. विद्यार्थ्यांना, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येत नाही. सतत वाहतूक कोंडी होत असते. अनेकदा दुचाकी पदपथावरून जात असतात. वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
- कुणाल वसंत बानूबाकोडे, शिक्षक

हा चौक मोठा असल्यामुळे येथे वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु केवळ दोन कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असतात. वाहनचालक सिग्नलचे उल्लंघन करून जाण्याची घाई करतात.’’ 
- जयसिंग पडवळ, वाहतूक पोलिस 

Web Title: vishrantwadi pune news road work