विश्‍व मराठी साहित्य संमेलन 28 ऑगस्टला कंबोडियाला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

- नववे विश्‍व मराठी साहित्य संमेलन 28 ऑगस्ट रोजी कंबोडियातील अंग्कोरवाट येथे आयोजित करण्यात आले

पुणे : नववे विश्‍व मराठी साहित्य संमेलन 28 ऑगस्ट रोजी कंबोडियातील अंग्कोरवाट येथे आयोजित करण्यात आले आहे. विश्‍व मराठी परिषदे अध्यक्ष कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी ही माहिती दिली. "पुरातन स्थापत्य शास्त्र' हे या या वर्षीच्या संमेलनाचे सूत्र असून, या वेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ लेखिका माधवी वैद्य यांनी केले. या वेळी राजेंद्र गुंड उपस्थित होते. 

गायकवाड म्हणाले, "शिवसंघ प्रतिष्ठान आणि विश्‍व मराठी परिषदेतर्फे हे संमेलन भरविण्यात येणार आहे. कंबोडियातील बाराव्या आणि तेराव्या शतकातील शेकडो मंदिरांची स्थापना हिंदू राजा सूर्यवर्ननने केली. आधुनिक साधनांशिवाय त्या मंदिरांवरील अप्रतिम कोरीव नक्षी, मंदिराचे स्थापत्य शास्त्र हे यंदाचे संमेलन कंबोडियात आयोजित करण्यामागचा हेतू आहे. असे अलौकिक आणि अद्‌भुत वास्तुशिल्प अनुभवण्याची संधी संमेलनानिमित्त नागरिकांना मिळणार आहे. त्यानिमित्त तेथील अन्य पर्यटनस्थळे आणि संस्कृतीही जवळून पाहता येईल. यापूर्वी झालेल्या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, खासदार विनय सहस्रबुद्धे, डॉ. तात्याराव लहान, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, इतिहासकार निनाद बेडेकर, पत्रकार संजय आवटे यांसारखे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

यंदाही पुरातन स्थापत्य शास्त्र या क्षेत्राशी संबंधित ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कलावंत आणि लेखक सहभागी होणार आहेत. याशिवाय मराठीतून विविध ज्ञान शाखांमध्ये अध्ययन, संशोधन, लेखन करणाऱ्यांना संमेलनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत.' 

Web Title: Vishwa Marathi Sahitya Sammelan will be held in Cambodia on the 28th August