दृष्टिहिन विद्यार्थ्यांच्या नजरेतून लेखनिक लिहतायेत पेपर

संदीप जगदाळे
शनिवार, 2 मार्च 2019

हडपसर : दहावीच्या परीक्षेला बसलेल्या दृष्टिहिन मुलांना गेनबा सोपानाराव मोझे शाळा गेल्या दहा वर्षांपासून लेखनिक पुरवते. यंदाच्या परीक्षेत देखील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विदयालयातील १७ दृष्टिहिन विदयार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून मोझे शाळेतील विदयार्थी जबाबदारी सांभाळत आहेत. 

हडपसर : दहावीच्या परीक्षेला बसलेल्या दृष्टिहिन मुलांना गेनबा सोपानाराव मोझे शाळा गेल्या दहा वर्षांपासून लेखनिक पुरवते. यंदाच्या परीक्षेत देखील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विदयालयातील १७ दृष्टिहिन विदयार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून मोझे शाळेतील विदयार्थी जबाबदारी सांभाळत आहेत. या उपक्रमामुळे दृष्टिहिन मुलांची सोय होते. तसेच दृष्टिहिन मुले व सामान्य मुले यांच्यात मैत्री घट्ट होते. त्याबरोबरच मोझे शाळेतील विदयार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व आपण समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना निर्माण होण्यास मदत होते.

दृष्टिहिन विदयार्थी साबीर शेख म्हणाला, दहावीच्या परीक्षेच्यावेळी विदयार्थ्यांना लेखनिक शोधण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. एकीकडे अभ्य़ास करायचा की, दुसरीकडे लेखनिक शोधायचा याची घालमेल सुरू असते. परीक्षेचा कालवधी असल्यामुळे विदयार्थी व पालक लेखनिक म्हणून काम करण्यास नकार देतात. मात्र मोझे शाळा गेली दहा वर्षे आमच्या शाळेतील विदयार्थ्यांना लेखनिक पुरवतात. त्यामुळे आम्हाला लेखनिकांची शोधाशोध करावी लागत नाही. 
 
प्राचार्य संजय सोमवंशी म्हणाले, ''आमची शाळा विदयार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध उपक्रम राबवते. त्याचा एक भाग म्हणून गेल्या दहा वर्षापासून दृष्टिहिन विदयार्थ्यांना लेखनिक पुरविण्याचा वसा संस्थेने घेतला आहे. यासाठी गेनबा सोपनराव मोझे शाळेचे अध्यक्ष व माजी आमदार रामभाउ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्र्वर मोझे, अलकाताई पाटील, मारूती दसगुडे, जयश्री बरडौल, सुलभा इथापे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आम्हाला मिळते. आमच्या शाळेतील विदयार्थी व पालक यांच्या सहकार्यातूनच हा उपक्रम सुरू आहे.''

लेखनीक अमेय पाटील म्हणाला, ''आम्हाला शाळेने दहावीच्या दृष्टिहिन विदयार्थ्यांसाठी लेखनिक म्हणून काम करण्याची संधी दिल्याने आम्हाला खूप आनंद झाला. दृष्टिहिन विदयार्थ्यांना जन्मतःच अनेक समस्या असतात. मात्र त्यावर मात करीत ते मोठया आनंदाने जीवन जगतात, मात्र आम्ही छोटया छोटया गोष्टींसाठी नाराज होतो. ही गोष्ट आम्हाला या माध्यमातून शिकायला मिळाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vision less students paper written by writer