विठ्ठलवाडी रस्त्याची चौकशी करा

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे. हा रस्ता २४ मीटर रुंद रस्ता बांधला असताना, प्रत्यक्षात तो काढताना त्यापेक्षा अधिक रुंदीचा काढण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

महापालिकेने विठ्ठलवाडी कमान ते वडगाव या विकास आराखड्यातील रस्ता बांधला होता. तो रस्ता पहिल्यापासूनच वादात सापडला आहे. त्या कामाच्या विरोधात पर्यावरण प्रेमी आणि महापालिका यांच्यात न्यायालयीन वाद रंगला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण प्रेमींच्या बाजूने निकाल देत, तो काढून टाकण्याबाबत आदेश दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी महापालिकेने केली. पण ती करताना जास्त रुंदीचा भाग उखडून टाकला, असा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला असून, त्यांनी कामाच्या निविदा आणि कामाच्या तपशिलाचा संदर्भ दिला आहे. सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर, असीम सरोदे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

हा रस्ता उखडताना महापालिकेने प्रत्यक्षात २४ मीटर रुंदीचा भाग उखडणे आवश्‍यक होते. काही ठिकाणी हा रस्ता ३० मीटर रुंद आणि काही ठिकाणी ५४ मीटर रुंदीचा भाग उखडला आहे. प्रत्यक्षात रस्ता बांधणीसाठी महापालिकेचे १८ कोटी रुपये खर्ची पडले. रस्ता उखडण्यासाठी आठ कोटी रुपये आणि न्यायालयीन लढाईतही दोन कोटी रुपये खर्च झाले असावेत, अशी माहिती यादवाडकर यांनी ‘सकाळ’ला दिली. 

ते म्हणाले, ‘‘महापालिकेने अद्याप पूर्ण रस्ता उखडला नसून, चारशे मीटरचा भाग शिल्लक आहे. चोवीस मीटरपेक्षा जास्त रुंदीचा भाग उखडण्यामागील कारण स्पष्ट होत नाही, यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन दिले आहे.’’

न्यायालयाच्या निर्णयानंतर रस्ता उखडण्याचे काम हाती घेण्यात आले. प्रत्यक्षात रस्ता तयार करताना इतर भागात रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे, दगड आदी पडलेले होते. तेही काढणे आवश्‍यक होते. तो उचलण्यात आला आहे. यामुळे नदीपात्र मोकळे होण्यास मदत झाली आहे. 
- अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com