ठेकेदाराला राष्ट्रवादीकडून उपाहारगृहाची बक्षिसी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पिंपरी - विठ्ठल- रुक्‍मिणी मूर्ती खरेदीच्या निविदेत सहभाग घेऊन निविदा रिंग करणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने पाठीशी घातले आहे. मूर्ती खरेदीतील ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची कारवाई करण्याऐवजी त्यातील साईसेवा एंटरप्राइजेस या पुरवठादार ठेकेदाराला महापालिका मुख्य कार्यालय इमारतीच्या आवारातील उपाहारगृह चालविण्याची बक्षिसी राष्ट्रवादीने दिली आहे. राष्ट्रवादीच्या या ठरावाची प्रशासनाने अंमलबजावणी करू नये, अशी मागणी नगरसेविका आशा शेंडगे यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. 

त्यांनी निवेदनात म्हटले आहे, की "संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीकऱ्यांना देण्यासाठी महापालिकेने विठ्ठल- रुक्‍मिणी मूर्तींची खरेदी केली होती. त्यासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत अक्षय ग्रीन एनर्जी, आल्हाट आर्ट स्टुडिओ आणि राज एंटरप्रायजेस यांच्या वतीने साई सेवा एंटरप्रायजेस या पुरवठादार ठेकेदाराने सहभाग घेतला होता. परंतु, या सर्वांनी या निविदा प्रक्रियेत साखळी केल्याचे महापालिकेच्या चौकशीत सिद्ध झाले आहे. यातील कोणीही निविदेतील अटी व शर्तींचे पालन केले नाही. हे सर्व पुरवठादार ठेकेदार एकच व्यक्ती असल्याचे अनेक पुरावे नगरसेविका सीमा सावळे व आपण स्वतः प्रशासनाकडे सादर केले आहेत.' 

मूर्ती खरेदीत अनेक अनियमितता असल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. अधिकारी, ठेकेदार, स्थायी समिती आणि सत्ताधारी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी यांनी संगनमत करून करदात्या नागरिकांचे लाखो रुपये लाटले आहेत. या प्रकरणात अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे काम प्रशासन करत आहे. परंतु, मूर्ती खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यापूर्वीच समिती सभापती व एका सदस्याने खरेदीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी केली आहे. या दोघांच्या विरोधात प्रशासनाने महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आवश्‍यकता आहे. 

सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विठ्ठल- रुक्‍मिणी मूर्ती खरेदीत कसा सहभाग होता, हे आधीच समोर आले आहे. या प्रकरणातील ठेकेदार साईसेवा एंटरप्रायजेसला महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या आवारातील उपाहारगृह चालविण्याची बक्षिसी राष्ट्रवादीने दिली आहे. सोमवारी (ता. 28 नोव्हेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेला विरोधक अनुपस्थित असल्याचा फायदा उठवून राष्ट्रवादी कॉंग्रेसने या ठेकेदाराला उपाहारगृह चालविण्यास देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. प्रशासनाने या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करावे, अशीही शेंडगे यांनी निवेदनातून मागणी केली आहे. 

Web Title: Vitthal-Rukmini idol scam