आवाज कुणाचा? "यिन' अध्यक्षांचा...!

आवाज कुणाचा? "यिन' अध्यक्षांचा...!

पुणे - मतपेटीतून एकएक मत काढले जात होते, तशी धाकधकू वाढत होती. मिनिटागणिक, मतागणिक उत्सुकता ताणली जात होती. प्रत्येक मत महत्त्वाचे आणि निर्णायक ठरू शकते, याची जाणीवही होती. थोडासा तणाव, काहीशी भीती आणि तितकाच उत्साह अशाच काहीशा वातावरणात "सकाळ माध्यम समूहा‘च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क‘द्वारे राज्यभरातील महाविद्यालयांत झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आणि नेतानिवडीचा एकच जल्लोष अनुभवायला मिळाला. 


या निवडणुकीच्या निकालाविषयी उमेदवारांसह मतदारांमध्येही प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळेच विजेत्यांची नावे घोषित होताच एकच जल्लोष आणि कल्ला झाला. विजयी उमेदवाराचे नाव जाहीर होताच "हिप हिप हुर्रेऽऽऽ‘ आणि "आवाज कुणाचाऽऽऽ?‘ अशा घोषणांनी विजयाचा आवाज अधिक बुलंद झाला.
महाविद्यालयीन तरुणाईतील बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणाऱ्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या नेतृत्वविकास उपक्रमांतर्गत "यिन‘ प्रतिनिधींच्या निवडीसाठी राज्यभरात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, साताऱ्यासह खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात शहर आणि ग्रामीण भागासाठी 2 व 3 सप्टेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया मोठ्या उत्साहाने पार पडली. राज्यभरातील सर्वच महाविद्यालयांनी या निवडणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद देताना मोठ्या उत्साहाने मतदान केले. दोन्ही दिवशी महाविद्यालयांसमोर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसले होते. या दोन्ही टप्प्यांतील निवडणुकीचा निकाल संबंधित महाविद्यालयांत जाहीर होताच आणि आपला आवडता उमेदवार निवडून आल्यावर तरुणाईने एकच जल्लोष केला. निवडणुकीत दिसलेला जोश निकालाच्या वेळेसही कायम होता. 


निकाल जाहीर होत असताना विद्यार्थ्यांमध्ये विजयोत्सवाचा रंग अधिकच भरला जात होता. आपल्या विजयी मित्राला, उमेदवाराला उचलून घेत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. निवडून आलेल्यांना शुभेच्छा देतानाच विजयाच्या घोषणाही दिल्या. उत्साह, आनंद आणि जल्लोषपूर्ण वातावरणात नेतानिवडीचा हा जोश सायंकाळपर्यंत सुरू होता. काही महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने मतदान घेण्यात आले होते. त्याचाही निकाल लागल्यानंतर तरुणाईचा जोश द्विगुणित झाला. आपल्या महाविद्यालयाला एक लीडर मिळाल्याची भावना प्रत्येकाने बोलून दाखवली. 


जिंकलेले शिलेदार "बाप्पा मोरयाऽऽऽ‘च्या जयघोषात आनंद साजरा करत होते. त्याचवेळी पराभूत उमेदवारांना "बेस्ट लक नेक्‍स्ट टाईट‘, असा धीरही देत होते. मैत्रीपूर्ण पण चुरशीने झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर तरुणाईने एकच जल्लोष केला. सर्व महाविद्यालयांच्या साक्षीने मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 

उत्साह आणि आनंद
- राज्यभरातील महाविद्यालयांत निकाल जाहीर होताच तरुणाईचा "कल्ला‘
- निवडणुकीत दिसलेला जल्लोष निकालाच्या वेळेसही कायम
- कुतूहल, आनंद आणि कृतज्ञतेची संमिश्र भावना
- फुले, हार घालून विजेत्यांचा सत्कार; फटाक्‍यांची आतषबाजी
- काही ठिकाणी विजेत्यांची मित्रांकडून मिरवणूक, गुलालाची उधळण
- राज्यातील अनेक महाविद्यालयांत बिनविरोध नेतानिवडीचा जल्लोष
 

गेल्या दोन वर्षांपासून "यिन‘बद्दल खूप ऐकले होते. मित्रांच्या मदतीमुळे "यिन‘चा प्रतिनिधी म्हणून झालेली निवड मला प्रत्येक वेळी प्रेरणा देणारी आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून बदल घडवून आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन.
- गणेश सावळे, एस. एस. मिणियार महाविद्यालय, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com