ही तर मतदारांची फसवणूक.. 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

राज्यात वेगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे सामान्य माणूस प्रचंड बुचकळ्यात पडल्याचे चित्र शनिवारी दिसले. सर्वच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत, असे सामान्य माणसाला वाटत आहे. 

पुणे -  राज्यातील सत्तास्थापनेसाठी चाललेला बाजार बघता, पुढच्यावेळी मतदान नक्की कुणाला करायचे, हा प्रश्न पडला आहे. स्वतःच्या खिशातले पैसे घालून गावाकडे मतदानासाठी गेलो; पण निवडून दिलेले उमेदवार खुर्चीच्या सत्तासंघर्षासाठी मतदारांचीच फसवणूक करीत आहेत. राज्यात वेगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे सामान्य माणूस प्रचंड बुचकळ्यात पडल्याचे चित्र शनिवारी दिसले. सर्वच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत, असे सामान्य माणसाला वाटत आहे. जे शिवसेनेने केले, तेच भाजपने केल्यास काय बिघडते, असेही काही लोक म्हणत आहेत. मात्र, नव्या सरकारने कृषी, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात काम करावे, अशी इच्छा तरुणांसह सामान्य जनतेने व्यक्त केली आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राजकीय घडामोडी फार उद्विग्न करणाऱ्या आहेत. राजकीय पक्ष सत्तेसाठी काहीही करायला तयार आहे. निदान आता तरी ही युती स्थिर सरकार देईल, अशी अपेक्षा धरायला हवी. येणाऱ्या सरकारने शिक्षण आणि कृषी क्षेत्राकडे लक्ष द्यावे. 
- गणेश सोनवणे 

लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत होईल, मतदानाबद्दल संभ्रम निर्माण होईल, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. पुढच्यावेळी मतदान का करावे, असा प्रश्‍न पडला आहे. 
- नीलेश आंबरे 

भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी असावी, त्यासाठी स्वतःच्या पुतण्यालाच त्यांनी प्यादा बनविले असावे, जेणेकरून भाजपला जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल, तेव्हा ते सिद्ध करता येणार नाही. कारण या मेलोड्रामामध्ये भाजपला लोकशाहीविरोधी आणि जनमानसाचा विश्वासघात करणारा पक्ष म्हणून सिद्ध करण्यात कदाचित शरद पवार यशस्वी झाले असावेत. 
- संघरक्षित मौर्य 

सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता ही परिस्थिती कोणत्याही चित्रपटापेक्षा काही वेगळी दिसत नाही. एकंदरीत चालत असलेला हा पेच महाराष्ट्राच्या जनतेला संभ्रमात पाडणारा आहे. सतत जे काही घडत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनमतेचा अपमान होत आहे. 
- स्नेहल तटकरे  

नेहमीप्रमाणे भाजपने सर्वांना आश्‍चर्यचकित केले; पण या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाकीचे दौरे सोडून महाराष्ट्रात लक्ष द्यावे. या राजकारणाचा नागरिकांवर परिणाम तर झालाच; पण पुढील निवडणुकीत जनता नक्कीच विचारपूर्वक मतदान करेल. 
- अश्विनी माने

राजकारणात फासे कधीही बदलू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, त्यामुळे कोणाचा शब्द किती विश्वासार्ह मानावा, हे आता जनतेनेच ठरवावं. 2014 मध्ये मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीसोबत कदापि युती करणार नाही, हे केलेलं विधान त्यांनी खोटं ठरवलं.. 
- पुष्कर आगाशे 

आजच्या शपथविधीने एक राजकीय गोंधळ संपून दुसरा गोंधळ सुरू झाला आहे. राजकारणात कोणीच कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात, ही बाब या सगळ्या प्रकारात अधोरेखित झाली. 
- अभिषेक घैसास 

सध्याच्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणात शिक्षण, विद्वत्ता, विवेक, क्षमता, काम, तत्त्व हे सगळेच मापदंड पुसट होत चालल्याचं दिसत आहे. राजकारण्यांसाठी "मायबाप' जनता नाममात्र मतदाता व केवळ "वोट बॅंक' स्वरूपात उरली आहे. 
- शर्वरी देशपांडे 

सत्ताकारणातील नवीन पर्याय चांगला आहे. कारण वर्षानुवर्षे एकाच पक्षाचे किंवा एकाच विचारसरणीच्या हातात सत्ता राहणे योग्य नाही. आघाड्या घडणे- बिघडणे व असे होत राहणे हे खऱ्या लोकशाहीचे लक्षण आहे. 
- सायली देशमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voter fraud in the state