मतदारपत्रिका घरोघरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

"बीएलओ'च्या माध्यमातून 26 लाख 32 हजार स्लिपा वाटणार 
पुणे : शहरातील मतदारांपर्यंत मतदारपत्रिका (व्होटर स्लिपा) पोचविण्यास महापालिका प्रशासनाने बुधवारपासून सुरवात केली आहे. त्या-त्या प्रभागांमधील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) माध्यमातून येत्या तीन दिवसांत सुमारे 26 लाख 32 हजार मतदारांना या स्लिपा दिल्या जातील; तसेच केंद्रांवर मतदारांना सुविधा पुरविण्यासाठीचे काम सुरू आहे, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी दिली. 

महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उभारण्याचे काम महापालिकेच्या निवडणूक विभागाने सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून मतदान आणि मतमोजणीकरिता केलेल्या प्रशासकीय कामांचा सोमवारी आढावा घेण्यात आला. ही कामे वेगाने करण्याच्या सूचना संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या वेळी करण्यात आल्या. 
कुलकर्णी म्हणाले, ""शहरातील विविध 41 प्रभागांमध्ये सुमारे 3 हजार 432 मतदान केंद्र निश्‍चित केले असून, त्यावर 19 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीचे नियोजन केले आहे; तसेच उमेदवारांच्या नावांनुसार मतदान यंत्रांची रचना करण्यात येत असून, त्यानुसार मतपत्रिका बसविण्यात येतील. त्यासाठी संबंधित प्रभागांमधील उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया करण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही कामे करण्यात येत आहेत.'' 
मतदान केंद्रनिहाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येत असून, एका केंद्रासाठी केंद्र अध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई असेल. शिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे. काही ठिकाणी होमगार्डही असतील. निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. 
ज्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर मतदान केंद्र आहे, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि अंध व्यक्तींसाठी आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत; तसेच प्रत्येक मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे, येत्या सोमवारी (ता. 20) कर्मचाऱ्यांना तिसरे प्रशिक्षण देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोरेगाव पार्क : महापालिका निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची नव्याने रचना करण्याचे काम बुधवारपासून हाती घेण्यात आले.  
 
Web Title: voter slip at home