नोटाबंदी प्रमाणेच मतदार आता भाजपबंदी करतील - निम्हण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमाणेच भाजप हादेखील या निवडणुकीतील शिवसेनेचा शत्रू असेल. युतीसाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला; परंतु भाजपमुळेच युती होऊ शकली नाही. कारण, युती होणार नाही, अशी खबरदारी भाजपने घेतली होती.
- विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना

पुणे - "भाजपला "ग'ची बाधा झाली आहे. लाटेमुळे नव्हे; तर पक्षाला सूज आली असून, ती उतरल्याशिवाय राहत नाही,' असा इशारा शिवसेनेने दिला, तसेच "नोटाबंदी प्रमाणेच मतदार या निवडणुकीत भाजपला बंदी घालतील. आत्मचिंतनाची वेळ त्यांच्यावर आणल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही,'' असा विश्‍वास शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपबरोबर युती नाही, अशी घोषणा गुरुवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केली. त्यानंतर लगेचच त्याचे पडसाद शिवसेनेत उमटले. पेठांमध्ये अनेक भागांत फटाके वाजून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले, तर शुक्रवारी सकाळी डेक्कन जिमखाना येथील पक्ष कार्यालयात शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. या वेळी गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.

"या कमळीचे करायचे काय, खाली डोके वर पाय'... "शिवसेनाप्रमुखांचा विजय असो'... "आला रे आला... शिवसेनेचा वाघ आला' आदी घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. त्या वेळी निम्हण, महादेव बाबर, सचिन तावरे, श्‍याम देशपांडे, अशोक हरणावळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. "आता फक्त शिवसेना या चार अक्षरांसाठी लढायचे,' अशी शपथ शिवसैनिकांनी घेतली. अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

गेली अडीच वर्षं शिवसैनिकांची घुसमट होत होती, असे सांगून निम्हण म्हणाले, ""वाघ दोन पावले मागे घेतो, तो झेप घेण्यासाठी. या निवडणुकीत शिवसेना महापालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही आणि भाजपला आलेली सूज उतरविल्याशिवाय राहणार नाही.'' या वेळी बाबर यांचेही भाषण झाले.

कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमाणेच भाजप हादेखील या निवडणुकीतील शिवसेनेचा शत्रू असेल. युतीसाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला; परंतु भाजपमुळेच युती होऊ शकली नाही. कारण, युती होणार नाही, अशी खबरदारी भाजपने घेतली होती.
- विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना

Web Title: voters will now ban the bjp party