मतदारयाद्यांत गोंधळ अन्‌ उन्हातही रांगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

पुणे - सोसायट्यांमधील मतदार सकाळपासून दुपारपर्यंत आणि वस्त्यांमधील मतदार सायंकाळी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र कोंढवा-येवलेवाडी (प्रभाग क्रमांक 41), अप्पर-सुपर इंदिरानगर (37) आणि कोंढवा खुर्द-मीठानगर (27) या तीन प्रभागांत ठळकपणे दिसले. नव्या प्रभागरचनेमुळे बदललेली मतदान केंद्रांची ठिकाणे, मतदार याद्यांमधील काही प्रमाणात झालेला गोंधळ आणि उन्हाच्या झळा सोसूनही मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेले मतदार, असेही चित्र मंगळवारी या तीन प्रभागांत दिसले.

कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी या प्रभागात एकूण 48 हजार मतदार आहेत.

कोंढवा खुर्द - मीठानगर या प्रभागात 50,800 मतदार आहेत, तर अप्पर इंदिरानगर या प्रभागात 40,503 मतदार आहेत. तिन्ही प्रभागांपैकी सर्वाधिक मतदान कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी या प्रभागात झाले. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 41 मध्ये 24.81 टक्के, प्रभाग 37 मध्ये 18 टक्के आणि प्रभाग 27 मध्ये 18.20 टक्के मतदान झाले होते. मतदान केंद्राबाहेर ठळकपणे लावलेले फलक, सोसायट्या, गल्ली आणि वस्तीबाहेरच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेली मदत केंद्रे यामुळे मतदारांची मोठी सोय झाली. घराबाहेर पडल्यानंतर प्रथम मदत केंद्रावरच आपली स्लिप घेण्याकडे मतदारांचा कल दिसून आला. त्यानंतर संबंधित मतदान केंद्र व तेथील विशिष्ट क्रमांकाच्या खोलीमध्ये जाऊन मतदान केले जात होते. ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य देत मतदान केंद्रावरील पोलिस कर्मचारी आणि निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावत होते. मतदानासाठी आलेल्या लोकांमध्ये महिलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय होते.

उन्हाची तीव्रता वाढल्यानंतरही साडेबारा वाजेपर्यंत नागरिकांमध्ये मतदानासाठी बाहेर पडण्याचा उत्साह दिसत होते. त्यानंतर मात्र मतदारांची संख्या कमी झाली. दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान पुन्हा मतदारांचा ओघ सुरू झाला. साडेतीन वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक 41 मध्ये 51.26 टक्के, प्रभाग क्रमांक 37 मध्ये 39.82 टक्के आणि प्रभाग क्रमांक 27 मध्ये 38.73 टक्के मतदान झाले. वस्त्यांच्या परिसरात असलेल्या मतदान केंद्रांमध्ये सायंकाळी चार ते पाचच्या सुमारास अचानक मतदारांची संख्या वाढल्याचेही दिसून आले.

Web Title: voting list confussion & voter line