पिंपळे सौदागरमध्ये मतदारांत उत्साह

पिंपळे सौदागर - मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांनी खोली क्रमांक शोधण्यासाठी केलेली गर्दी.
पिंपळे सौदागर - मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांनी खोली क्रमांक शोधण्यासाठी केलेली गर्दी.

शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात दुपारी दीडपर्यंत ४२ टक्के मतदान

पिंपरी - पिंपळे सौदागर (प्रभाग क्रमांक २८), पिंपळे गुरव (प्रभाग क्रमांक २९) आणि दापोडी (प्रभाग क्रमांक ३०) परिसरात मतदानाचा उत्साह दिसून आला. शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात मतदान पार पडले.

जनजागृतीचा प्रभाव आणि सोसायटीधारकांच्या पॅनेलमुळे पिंपळे सौदागरमधील अधिकाधिक मतदार मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे अन्य प्रभागांच्या तुलनेत पिंपळे सौदागरमध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजेच सरासरी ४२ टक्के मतदान झाले. तर अन्य दोन प्रभागांमध्ये दुपारपर्यंत ३६ ते २८ टक्के मतदान नोंदविले गेले. 

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिकेने यंदा जनजागृतीवर मोठा भर दिला होता. त्याचा प्रभाव मतदानावर दिसून आला. हिंजवडीतील जवळपास सर्व आयटी कंपन्यांनी मतदानासाठी कर्मचाऱ्यांना दोन ते तीन तासांची सवलत दिली होती. त्यामुळे सकाळी लवकर मतदान करण्यावर आयटीयन्सचा भर होता. ‘आयटीयन्स हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरामध्ये हे चित्र प्रकर्षाने दिसून आले. सकाळच्या पहिल्या सत्रात आयटीयन्सची गर्दी झाल्याने मतदानासाठी एक तास लागल्याचा अनुभव काहींनी सांगितला. त्यामुळे सकाळच्या पहिल्या टप्प्यात येथील मतदानाचा टक्का १५, पिंपळे गुरवमध्ये दहा तर, दापोडीतील बहुतांश केंद्रांवर पहिल्या टप्प्यात केवळ सहा टक्के मतदान झाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रापर्यंत अनुक्रमे २९ ते ४२ टक्के (पिंपळे सौदागर), २२ ते ३६ टक्के (पिंपळे गुरव) आणि १६ ते २८ (दापोडी) टक्के मतदान होते. ऐन दुपारच्या वेळेतही मतदान केंद्रावरील ओघ कायम होता. त्यात सोसायटीधारकांचा टक्का अधिक होता. 

तृतीयपंथांचेही मतदान
दापोडी येथील एका मतदान केंद्रावर काही तृतीयपंथांनीही मतदानाचा हक्क बजावला. आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये आवर्जून मतदान केल्याचे मेहबूब नबीशा सय्यद यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

मतदारांचा गोंधळ
सुरवातीला प्रत्येक मतपत्रिकेसाठी स्वतंत्र मतदान यंत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात त्यात बदल करून उमेदवार संख्या कमी असल्यास एका यंत्रावर एकाहून अधिक मतपत्रिकेचा समावेश करण्याचा निर्णय झाला. त्याबाबत फारशी जनजागृती झाली नसल्याने ऐनवेळी मतदारांचा गोंधळ उडाला. त्याची माहिती देण्यात निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा वेळ जात होता. त्यामुळे एका मतदानासाठी साधारणपणे दीड ते दोन मिनिटांचा अवधी लागत होता. त्यामध्ये सुशिक्षित मतदारांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले.

अशीही जनजागृती
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी शहर लाँड्री संघटनेने नवा ‘फंडा’ राबविला. ‘बोटावरची शाई दाखवा आणि एक शर्टपॅंट मोफत इस्त्री करून न्या,’ असा उपक्रम राबवून त्यांनी मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. 

क्षणचित्रे
मतदारांसाठी मंडप
ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी व्हीलचेअरची सोय
प्रभाग क्रमांक ३० मधील पालिका शाळा केंद्रावर पोलिसांचा मोठा फौज फाटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com