झेडपीच्या शाळेत शिका बारावीपर्यंत

भरत पचंगे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

चारस्तरीय गुणांकनामधून ओजस उपक्रमासाठी शाळा निवडल्या आहेत. यात वाबळेवाडी शाळेने राज्यात पहिल्या क्रमांकाचे गुण मिळविले आहेत.
- दत्तात्रेय वारे, मुख्याध्यापक वाबळेवाडी शाळा

वाबळेवाडीत यंदापासून टप्प्याटप्प्याने पुढील वर्ग

शिक्रापूर, (ता. शिरूर, पुणे): राज्य सरकारच्या "ओजस शाळा' उपक्रमात वाबळेवाडी (ता. शिरूर) जिल्हा परिषद शाळेची निवड झाली आहे. यामुळे या शाळेत इयत्ता आठवीचा वर्ग या वर्षी सुरू होणार असून, टप्प्याटप्प्याने बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय या शाळेतील शिक्षकांची पुढील पाच वर्षे बदली न करण्याचा निर्णय यात आहे. यामुळे इयत्ता बारावीपर्यंत वर्ग असणारी वाबळेवाडी राज्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा ठरणार आहे.

ग्रामस्थांच्या पाठबळामुळे काय होऊ शकते, हे वाबळेवाडीची टॅबलेट शाळा पाहून दिसते. शाळेसाठी कोट्यवधी रुपये किमतीची जागा देण्यापासून यात्रा रद्द करून लोकवर्गणी शाळेसाठी वापरण्याचा निर्णय जेमतेम 65 उंबऱ्याच्या या वाडीने घेतलेला आहे. ग्रामस्थांच्या या दातृत्वाला आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेनेही दीड कोटी रुपयांची मदत करून प्रोत्साहन दिले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने गेल्या वर्षी इंटरनॅशनल स्कूलसाठी मंजूर केलेल्या राज्यातील 113 शाळांमधील 13 शाळा ओजस शाळा म्हणून मंजूर केल्या आहेत. स्थानिकांच्या पाठबळासह नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती, लोकवर्गणीतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांचा चतुरस्र (क्रीडा, कला, साहित्य आणि जागतिक दर्जाचे माहिती तंत्रज्ञान) विकास अशा स्वरूपाची शिक्षणपद्धती ओजस या उपक्रमात सरकारला अभिप्रेत आहे. राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या कल्पनेतून विकसित झालेली ओजस शाळा इतर नऊ शाळांना विकसित करतील आणि त्यांना तेजस शाळा म्हटले जाणार आहे.

अशी झाली ओजससाठी निवड

  • मुख्याध्यापकांची मुलाखत,
  • पिसा (प्रोगाम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट्‌स असेसमेंट) परीक्षा,
  • प्रकल्प सादरीकरण
  • उद्दिष्टावरील प्रकल्प अहवाल

-ओजस, तेजसाठीचा अभ्यासक्रम महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ तयार करणार
-येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम कार्यान्वित
-पिसाअंतर्गत लेखी-तोंडी परीक्षेद्वारे शिक्षकांची होणार नेमणूक
-नेमणूक पुढील पाच वर्षांसाठी असणार
-नियुक्त शिक्षकाचे प्रतिवर्षी मूल्यांकन

स्कूल इंटरनॅशनल मात्र, माध्यम मराठी
इंटरनॅशनल स्कूल अशी मान्यता मिळालेल्या वाबळेवाडी शाळेत मराठी माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाणार आहे. मातृभाषेत ज्ञानग्रहण परिपूर्ण होते, असे जागतिक सर्वेक्षण असल्याने आम्ही मराठीचा आग्रह धरून इंटरनॅशनल स्कूलसाठी प्रयत्न केल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाबळे व दिलीप वाबळे यांनी दिली.

ओजस शाळा म्हणजे काय?

  • स्थानिक ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेचा सर्वांगीण विकास साधणे अभिप्रेत आहे.
  • पालकांच्या इच्छेनुसार शाळेत विविध उपक्रम राबविणे
  • आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमानुसार पाल्यांना जागतिक शिक्षणप्रवाहासाठी सक्षम करणे
Web Title: wablewadi zp school hsc standard