वडगावसह 6 ग्रामपंचायतींची निवडणूक 25 फेब्रुवारीला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या वडगाव ग्रामपंचायतीसह भाजे, लोहगड, वाकसई, सांगिसे व मुंढावरे या सहा ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक; तसेच इतर सोळा ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणूक येत्या 25 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती तहसीलदार रणजित देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी दिली. 

वडगाव मावळ - मावळ तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या वडगाव ग्रामपंचायतीसह भाजे, लोहगड, वाकसई, सांगिसे व मुंढावरे या सहा ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक; तसेच इतर सोळा ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या जागांसाठी पोटनिवडणूक येत्या 25 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती तहसीलदार रणजित देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी दिली. 

येत्या मार्च ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यात मावळ तालुक्‍यातील सर्वांत मोठ्या वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीसह भाजे, लोहगड, वाकसई, सांगिसे व मुंढावरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पुसाणे, शिलाटणे, ओझर्डे, आपटी, मळवली, आंबी, येलघोळ, टाकवे बुद्रुक, खांड, साते, खडकाळा, थुगाव, परंदवडी, आंबेगाव, माळवाडी व वराळे येथील रिक्त असलेल्या काही जागांची पोटनिवडणूक घेण्याचा आदेशही आयोगाने दिला आहे. निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे ः 5 ते 10 फेब्रुवारी- उमेदवारी अर्ज दाखल करणे, 12 फेब्रुवारी- उमेदवारी अर्जांची छाननी, 15 फेब्रुवारी- उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, 25 फेब्रुवारी - मतदान, 27 फेब्रुवारी - मतमोजणी. 

मतदान वगळता निवडणुकीची सर्व प्रक्रिया वडगाव मावळ येथील महसूल भवनात होणार आहे. निवडणूक जाहीर झालेल्या गावांमध्ये आचारसंहिता लागू झाल्याची माहिती देसाई व भोसले यांनी दिली. 

नगरपंचायतीचा प्रस्ताव बासनात 
गेल्या तीन वर्षांपूर्वी तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची घोषणा सरकारने केली होती. वडगाव ग्रामपंचायतीचाही त्यात समावेश होता. नगरपंचायतीच्या चर्चेमुळे गेल्या दोन वर्षांत ग्रामपंचायतीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अखेर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत पूर्ण झाल्यानंतर पुढील निवडणूक ही नगरपंचायतीचीच होणार, अशी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची अपेक्षा होती; परंतु आता ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने ही अपेक्षा फोल ठरली आहे.

Web Title: wadgaon maval gram panchayat election