#कारणराजकारण : ‘आयटी हब’ला समस्यांचा भुंगा

Wadgaon Sherry Constituency IT Hub
Wadgaon Sherry Constituency IT Hub

#कारणराजकारण
वार्तापत्र : वडगाव शेरी मतदारसंघ 
‘आयटी हब’ अशी ओळख असलेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात आहे. पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, गुन्हेगारी यांसारख्या जटिल प्रश्‍नांनी मतदारसंघातील नागरिक त्रस्त आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यास लोकप्रतिनिधींबरोबरच प्रशासनही उदासीन असल्याचे येथील लोक सांगताहेत.

गावठाणे, झोपडपट्ट्यांबरोबरच उच्चभ्रू सोसायट्याही या मतदारसंघात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या नावाचे टॉवर याच मतदारसंघामध्ये आहे. पाणीटंचाई व वाहतूक कोंडी ही येथील कायमचीच समस्या आहे. लोहगाव, खांदवेवस्ती, निरगुडी रस्ता, खंडोबा माळ यांसह अन्य ग्रामीण भागाला आजही आठ दिवसांतून एकदाच पाणी मिळते. ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. स्वच्छतेचा अभाव असून, मैलापाणी, सांडपाणीवहनाची व्यवस्था अद्यापही नाही. हीच परिस्थिती मतदारसंघातील झोपडपट्ट्यांतील आहे. 

विश्रांतवाडी, धानोरी, कळस, वडगाव शेरी, विमाननगर, चंदननगर, कल्याणीनगर, येरवडा या भागांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. भामा आसखेड पाणी योजना दहा वर्षांनंतरही अद्याप पूर्ण होऊ न शकल्याने ही टंचाई आहे. याचाच फायदा येथील ‘टॅंकर माफिया’  उचलत आहेत. 

बीआरटी प्रकल्पामुळे नगर रस्ता अरुंद झाल्यामुळे दररोज सकाळी व संध्याकाळी नोकरदारांचे एक ते दोन तास वाहतूक कोंडीमध्ये जातात. पर्यायी मार्ग, उड्डाण पूल, भुयारी मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्नच न झाल्यामुळे हा प्रश्‍न जटिल झालेला आहे. त्याचा सर्वाधिक फटका आयटी उद्योग, व्यवसायांना बसत आहे. मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे, मात्र पदपथांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे त्यांना रस्त्याने चालताही  येत नाही. 

अवैध धंद्यामुळे तरुणाई व्यसनाकडे वळली आहे. तर मद्यपी, गर्दुल्ल्यांमुळे महिला असुरक्षित आहेत. गुन्हेगारीवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत. दोन-चार कामे वगळता लोकप्रतिनीधींनी कुठली कामे केली ते दाखवावे, असा प्रश्‍नही येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. 

मतदार म्हणतात...
सखाराम पवार : लोहगाव व परिसरामध्ये आठ दिवसांतून एकदा पाणी येते. पाणीच नसेल, तर माणसांनी जगायचे कसे? खराब रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था नाही. गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर पोलिसांचे नियंत्रण नाही.

विजय बनसोडे : वाहतूक कोंडी व पाणी हे या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्‍न आहेत. पर्यायी मार्ग नसल्यामुळे नगर रस्त्यासह काही मुख्य मार्गांवर वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीचा त्रास आहे. 

रंजना पाटील : महिलांची सुरक्षितता, बेरोजगारी, अवैध धंदे, बेकायदा प्रवासी वाहतूक, वाढती गुन्हेगारी या प्रश्‍नांकडे राजकीय व प्रशासकीय पातळीवर लक्ष दिले जात नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com