पुणे : चक्क ग्रामपंचायतीने गावकऱ्यांविरोधात दाखल केली तक्रार!

Wagholi
Wagholi

वाघोली : सोसायटी धारकानो कंमेंट्स करून प्रश्न सुटत नाही. सोशल मीडियावर वाईट कंमेंट्स करण्यापेक्षा ग्रामपंचायती बरोबर प्रत्यक्ष येऊन 'वाघोली स्वच्छते'साठी पुढाकार घ्या, असे आवाहन करतानाच रस्त्यावर सोसायटीधारकच कचरा आणून टाकतात. तुम्हीच कचरा करायचा आणि तुम्हीच वाईट कंमेंट्स करायची ही कोणती पद्धत? असा संतप्त सवाल ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीची बदनामी केल्याबद्दल पोलिसात तक्रार दिली. 

कचरा आणि अन्य प्रश्न सोडविण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरत असल्याने ती बरखास्त करावी व पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी ऑनलाइन पिटीशन टाकन्यात आली आहे. या पिटीशनमध्ये 2000 सोसायटी धारकांनी कंमेंट्स केल्या आहेत. त्यातील अनेक कंमेंट्स वाईट शब्दांत केल्या आहेत. यामुळे संतप्त ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र निषेध केला. सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच जयश्री काळे, रामदास दाभाडे, समीर भाडळे, मधुकर दाते, यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

"तुम्हाला जे काही मांडायचे आहे, ते ग्रामपंचायतीमध्ये येऊन मांडा. लेखी तक्रार करा. ग्रामसभेतही मत मांडण्याचे नागरिकांना अधिकार आहेत. मात्र, सोसायटी धारक एअरकंडिशनमध्ये बसून सोशल मीडियावर कंमेंट करत बसतात. गाव स्वच्छ असावे, असे प्रत्येक नागरिकाला वाटते. मात्र, केवळ ग्रामपंचायत काही करू शकत नाही. नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे.

सोसायटीधारकांनी दररोज येऊन ग्रामपंचायती बरोबर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा. नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामपंचायत कायम प्रयत्न करीत आहे. मात्र चुटकी सारखे सुटणारे प्रश्न नाही. त्यासाठी काही कालावधी लागेल. केवळ सोशल मीडियावर चमकोगिरी करू नये. असा संतप्त सूर होता. पत्रकार परिषदेनंतर सर्व सदस्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दिली.

सदस्यांचे म्हणणे काय आहे? 

1) वाघोलीत 13000 सदनिका
2) अनेक सदनिकांची नोंदच नाही. मग निधी येणार कोठून ? 
3) 16 कोटी रुपये सोसायटी धारकांकडे थकबाकी.
4) रस्त्यावर कचरा टाकण्याचे काम सोसायटी धारकांचेच
5)  सोसायटी पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन ही जबाबदारी बांधकाम व्यावसायिक व पी एम आर डी ए.ची.
6) एकाही सोसायटी मध्ये कचरा खत प्रकल्प सुरू नाही. एस टी पी प्लँटही बंद.
7) सोसायटी धारकांची केवळ सोशल मीडियावर चमकोगिरी
8) झालेली विकास कामे सोशल मीडियावर येत नाही. 
9) एअर कंडिशन मध्ये बसून सतत ग्रामपंचायतीवर टीका करण्याचे काम
10) ज्या सुविधा बांधकाम व्यावसायिकांनी पुरविल्या नाहीत. त्याबाबत कोणतीही तक्रार नाही. तेथे मात्र  सोसायटी धारकांचे मौन.
11) सोशल मीडियावर बोगस अकाउंट उघडून टीका.
12) अनेक प्रश्न ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत नाही. मात्र तरीही त्यावर टीका.
13) आमच्या पुढाकारामुळेच प्रश्न मार्गी लागल्याचा नेहमी आव.

ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे काम ठराविक 5-7 सोसायटी धारकच करीत आहेत. त्यांना झालेली विकास कामे दिसत नाही. ते सतत सोशल मीडियावर चमकोगिरी करतात. असा आरोप सदस्यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com