वाघोलीत बनावट मतदार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

वाघोली - शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीत पूर्व हवेलीतील विशेषतः वाघोलीतील सुमारे ३४०० नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला. मात्र मतदारांचे अर्ज व कागदपत्रांची तपासणी न करताच ही नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदारांच्या अर्जाच्या या गठ्ठ्यासोबत हवेली तहसीलदारांच्या पत्राचा परस्पर वापर करण्यात आला आहे. त्याची नोंद हवेली तहसीलदारांकडे नाही. तसेच या

वाघोली - शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीत पूर्व हवेलीतील विशेषतः वाघोलीतील सुमारे ३४०० नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला. मात्र मतदारांचे अर्ज व कागदपत्रांची तपासणी न करताच ही नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदारांच्या अर्जाच्या या गठ्ठ्यासोबत हवेली तहसीलदारांच्या पत्राचा परस्पर वापर करण्यात आला आहे. त्याची नोंद हवेली तहसीलदारांकडे नाही. तसेच या

अर्जांसोबत जोडलेली अनेक कागदपत्रे बनावट आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रामदास दाभाडे यांनी हा प्रकार उजेडात आणला. दरम्यान या प्रकाराबाबत आमदार बाबूराव पाचर्णे व दाभाडे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. 

१ ते ३१ जुलैदरम्यान तरुण व पात्र प्रथम मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी वाघोलीत सुमारे २० बीएलओंची (बूथ लेव्हल ऑफिसर) नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नवीन मतदारांचे अर्ज भरून घेतले. हे अर्ज त्यांनी वाघोली तलाठी यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये पूर्व हवेलीतील विशेषतः वाघोलीतील सुमारे ३४०० नवीन नावांचा समावेश झाल्याचे दिसून आले. बीएलओंनी भरून घेतलेल्या मतदारांची नावे त्या यादीत आली नाहीत.

यादीत समाविष्ट केलेल्या नावातील हजारो मतदार ओळखीचे नसल्याने रामदास दाभाडे यांनी त्याची सविस्तर माहिती घेतली. त्या वेळी वाघोलीच्या तलाठ्यांनी मतदारांचे अर्ज व त्यासोबतचे पत्र हवेली तहसील कार्यालयाकडे न पाठवता परस्पर शिरूर तहसील कार्यालयाकडे पाठविले. शिरूर तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने त्यावर, ‘काही अर्जात गुलाबी प्रती जोडलेल्या नाहीत. अर्ज मंजूर/नामंजूर उल्लेख केलेला नाही. अर्ज जमा करणाऱ्यांनी पोच घेतलेली नाही,’ असा शेरा मारला. मात्र तरीही त्या अर्जांची तपासणी न करताच त्या सर्व नावांचा समावेश प्रारूप मतदारयादीत करण्यात आला.

वाघोलीतील अर्जांची तपासणी करून व त्यावर मंजूर-नामंजूर शेरा मारणे ही हवेली तहसील कार्यालयाची जबाबदारी आहे. त्यानंतर मंजूर नावे यादीत समाविष्ट करण्याची जबाबदारी आमची आहे. आमच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाला हवेली तहसीलदारांचे पत्र जोडलेले होते. या संदर्भात तक्रार मिळाली असून त्याची सविस्तर माहिती घेत आहे.
- रणजित भोसले, तहसीलदार, शिरूर

आमच्याकडे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. वाघोलीवगळता अन्य गावांतील सर्व अर्ज व पत्राची नोंद आमच्याकडे आहे.
- सुनील भगत, निवडणूक नायब तहसीलदार, हवेली

वाघोली ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच हा प्रकार करण्यात आला आहे. ती सर्व नावे मतदार यादीतून वगळावीत. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचारी व संबंधितांवर कारवाई करावी. 
- रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

दाभाडे यांनी तक्रार केल्यानंतर नावे प्रारूप यादीत समाविष्ट झाल्याचे कळाले. याबाबत सविस्तर माहिती घेत आहे.
- डॉ. सुनील शेळके, निवासी नायब तहसीलदार, हवेली

Web Title: wagholi pune news bogus voter