वाघोलीत टॅंकर दरवाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

वाघोली - पाणी टॅंकरमालकांनी दरात वाढ केली आहे. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. दरवाढ न मिळाल्यास टॅंकर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय वाघेश्वर टॅंकरमालक संघटनेने घेतला आहे. या दरवाढीमुळे सोसायटीधारकांच्या खर्चाचा बोजा वाढणार आहे.  

वाघोली - पाणी टॅंकरमालकांनी दरात वाढ केली आहे. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. दरवाढ न मिळाल्यास टॅंकर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय वाघेश्वर टॅंकरमालक संघटनेने घेतला आहे. या दरवाढीमुळे सोसायटीधारकांच्या खर्चाचा बोजा वाढणार आहे.  

वाघोलीत बहुतांश सोसायटीधारकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. वाघोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला अपुरी असल्याने सोसायटीधारकांना पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे त्यांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. पाण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला महिन्याला १००० ते १५०० रुपये खर्च येतो. सध्या एका टॅंकरसाठी ३०० ते १५०० रुपये खर्च येतो. आम्ही कर भरतो तर आम्हाला पाणी द्या, असे सोसायटीधारकांचे म्हणणे आहे; मात्र ग्रामपंचायतीने पूर्वीची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणीपुरवठा योजना राबविली आहे. यामुळे वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला शक्‍य नाही. टॅंकरचालकांनी सहा हजार लिटर टॅंकरसाठी ५०० रुपये, दहा हजार लिटरसाठी ९०० रुपये, वीस हजार लिटर पाण्यासाठी १८०० रुपये, तर महापालिकेच्या शुद्ध पाण्यासाठी दहा हजार लिटरच्या टॅंकरसाठी २५०० ते वीस हजार लिटरच्या टॅंकरसाठी पाच हजार रुपये दर निश्‍चित केले आहे.

टॅंकरमालकांच्या दरवाढीमुळे सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांचे बजेटही कोलमडणार आहे.

कर घ्या; पुरेसे पाणी द्या!
फेब्रुवारी ते मेपर्यंत पाणी जास्त लागते. यामुळे खर्चात अधिकच वाढ होते. सरासरी एका कुटुंबाला महिन्याकाठी १५०० ते १८०० रुपये पाण्यासाठी मोजावे लागतात. एकीकडे दिल्ली सरकार मोफत पाणी देत असताना महाराष्ट्रात ही स्थिती आहे. कर घ्या; मात्र मुबलक पाणी तरी द्या, अशी प्रतिक्रिया सोसायटीधारक व्यक्त करत आहेत. 

...तर हाल होतील
सध्या बहुतांश सोसायटीधारकांना टॅंकरने पाणी घ्यावे लागते. टॅंकरमालकांना दरवाढ न मिळाल्यास बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यामुळे पाण्याअभावी नागरिकांचे हाल होण्याची शक्‍यता आहे. हाल होऊ नये, यासाठी वाढीव दराने पाणी घेण्याची वेळ सोसायटीधारकांवर येणार आहे.

Web Title: wagholi pune news water tanker rate increase