वाघ्या-मुरळी परिषदेचा इंदापुरात मोर्चा; सरकारला दिला निर्वाणीचा इशारा

डॉ. संदेश शहा
Tuesday, 20 October 2020

महाराष्ट्र राज्य वाघ्या मुरुळी परिषदेच्या वतीने आठ मागण्यांसाठी जुने न्यायालय चौक ते इंदापूर प्रशासकीय भवनवर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जोगवा आंदोलन करण्यात आले.

इंदापूर : महाराष्ट्र राज्य वाघ्या मुरुळी परिषदेच्या वतीने आठ मागण्यांसाठी जुने न्यायालय चौक ते इंदापूर प्रशासकीय भवनवर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जोगवा आंदोलन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, प्रा. साठे यांच्या हस्ते तहसीलदार सोनाली मेटकरी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी वाघ्या मुरुळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कन्हेरे, जिल्हा उपाध्यक्ष छबाताई वाघापुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटक कुमार साठे , तालुकाध्यक्ष धोंडीराम कारंडे उपस्थित होते. लहूजी शक्ती सेनेने देखील या मोर्चास पाठिंबा दिला.

यावेळी मार्तंड साठे म्हणाले, ''शासनाने वाघ्या मुरळी लोककलेस अधिकृत मान्यता देवून लोक कलावंतासाठी स्वतंत्र लोककलावंत आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, त्यांना कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करावी, कलावंताच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, कलावंतांना जमीनघर स्वरूपात योजना सुरू करावी, देवालय, मंदिरे व राऊळे सुरू करावेत, सामाजिक अंतराचे पालन करून कुलधर्म कुलाचाराचे पालन करावेत या आमच्या मागण्या आहेत. 

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

राज्यात साडेसत्तावन हजार कलावंत असून, साडेचार हजार पथके आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही या मागण्यांचा पाठपुरावा करत असून, आत्तापर्यंत ११ कलावंताचा उपासमार किंवा काम नसल्याने मृत्यू झाला आहे. आम्ही शासनास निवेदने पाठवली, आंदोलन केले तरी सुद्धा मायबाप सरकारला
जाग येत नाही. त्यामुळे शासनाने मागण्या मान्य न केल्यास विधानभवनावर जागरण गोंधळ करून शासनविरोधात समाज प्रबोधन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

पुणे-दौंड लोकल उद्यापासून सुरू होण्याची शक्यता

वाघ्या मुरळी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जोगवा आंदोलनात असल्याने तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी निवेदन स्वीकारावे अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी भर उन्हात ४० मिनिटे वाट पाहिली मात्र तहसीलदार न आल्याने त्यांनी शेवटी बये दार उघड, बये दार उघड अशी देवीची आळवणी केली. नंतर तहसिल कार्यालयात जाऊन त्यांनी निवेदन दिले. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waghya-Murali Parishad Morcha in Indapur