
Pune Crime : पबमध्ये प्रवेश न दिल्याने वेटरवर हत्याराने वार; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
पुणे : पबमध्ये रात्री प्रवेश न दिल्याच्या कारणावरून तिघांनी एका वेटरवर हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न केला. ही घटना मुंढवा परिसरात एबीसी रस्त्यावरील ताडीगुत्त्याजवळ शनिवारी (ता. २७) पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी धीरेंद्र अवदेश चौहान (वय २७, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) याने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अबीद युसुफ खान (वय २०, रा. लोहियानगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरेंद्र हा हॉटेल ओरिलामध्ये वेटर आहे.
शनिवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास तो त्याचा सहकारी विक्रम उदाइन याच्यासोबत पायी जात होता. हे दोघे ताडीगुत्त्याजवळ आल्यानंतर आरोपी अबीद युसुफ खान आणि त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यापैकी दोघांनी विक्रम याला पकडून ठेवले.
तर एकाने धीरेंद्रला ‘पबमध्ये प्रवेश का दिला नाही’, असे म्हणत त्याच्या पाठीवार आणि डोक्यात हत्याराने वार केले. या हल्ल्यात धीरेंद्र गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप जोरे करीत आहेत.