देशातील सर्वाधिक उंचीच्या राष्ट्रध्वजाला फडकण्याची प्रतीक्षा 

दीपेश  सुराणा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पिंपरी - देशातील सर्वाधिक उंचीचा निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात उभारलेला राष्ट्रध्वज (107 मीटर) वाऱ्याच्या झोताने सतत फाटत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गेल्या महिनाभरापूर्वी तो खाली उतरविला आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी (15 ऑगस्ट) तरी या ध्वजाचे काम पूर्ण होऊन तो डौलाने फडकणे अपेक्षित आहे. 

पिंपरी - देशातील सर्वाधिक उंचीचा निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात उभारलेला राष्ट्रध्वज (107 मीटर) वाऱ्याच्या झोताने सतत फाटत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गेल्या महिनाभरापूर्वी तो खाली उतरविला आहे. स्वातंत्र्य दिनापूर्वी (15 ऑगस्ट) तरी या ध्वजाचे काम पूर्ण होऊन तो डौलाने फडकणे अपेक्षित आहे. 

देशाच्या वाघा सीमेजवळ यापूर्वी उभारलेल्या 105 मीटर इतक्‍या उंचीच्या राष्ट्रध्वजापेक्षा निगडी येथील राष्ट्रध्वजाची उंची जास्त आहे. निगडी येथील ध्वजस्तंभावरील ध्वजाचा आकार 80 फूट बाय 120 फूट इतका आहे. 26 जानेवारीला या ध्वजाचे अनावरण झाले होते. वाऱ्याच्या झोताने ध्वज फाटत असल्याने तसेच पावसाळी वातावरणामुळे ध्वज महिनाभरापूर्वी खाली उतरविण्यात आला होता. ध्वजाचे कापड फाटत असल्याने कापडाचा नमुना तपासणीसाठी डिपार्टमेंट ऑफ फायबर ऍण्ड टेक्‍स्टाईल प्रोसिजर टेक्‍नॉलॉजी या सरकारी संस्थेकडे दिला आहे. संबंधित संस्थेकडून त्याबाबत संशोधन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

निगडी येथे तब्बल 107 मीटर इतक्‍या उंचीवरील ध्वजस्तंभावर ध्वज फडकविण्यात येतो. त्यामुळे इतक्‍या उंचीवर वाऱ्याच्या वेगाने ध्वजाचे कापड कोपऱ्यात फाटते. पावसाळ्यात कापडाचे वजन वाढते. ध्वज नियमित लावायचा की काही कार्यक्रमांसाठी लावायचा, याबाबत धोरण ठरविण्याचे काम सुरू आहे. 
- शिरीष पोरेड्डी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग 

ध्वजस्तंभावर ध्वज चढविण्याचे व उतरविण्याचे काम कंत्राटी संस्थेला दिले आहे. सुरक्षा करण्याची आमची जबाबदारी असते. ध्वजाचे वजन 80 किलो आहे. पावसामुळे ध्वज भिजल्याने त्याचे वजन आणखी वाढते. त्यामुळे ध्वज फाटत असल्याने गेल्या महिनाभरापासून ध्वज फडकावलेला नाही. 
- उदय जरांडे, सुरक्षा अधिकारी 

राष्ट्रध्वजाचे कापड चांगले नसल्यानेच ध्वज फाटला असावा. आत्तापर्यंत सात ते आठ वेळा तो उतरविण्यात आला. त्यानंतर पुन्हा लावलेला नाही. तो लवकरात लवकर लावणे आवश्‍यक आहे. 
- मनोज पाटील, तरुण 

राष्ट्रध्वज स्वातंत्र्य दिनापूर्वी (15 ऑगस्ट) लावणे आवश्‍यक आहे. ध्वजासाठी चांगल्या दर्जाचे कापड घेतल्यास ही अडचण जाणवणार नाही. 
- सुशांत वारके, तरुण 

Web Title: Waiting for country's highest national flag