आता प्रतीक्षा वाघोली पाणी योजनेची

आता प्रतीक्षा वाघोली पाणी योजनेची

पिंपरी - पुणे महापालिकेची वाघोलीसाठीची भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. शिवाय, पवना नदीवरील वाघोली पाणीपुरवठा योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास पुणे महापालिकेने तत्त्वतः मान्यता दिलेली आहे. त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी आता पवनेवरील वाघोली प्रकल्पाचे पाणी मिळण्याची प्रतीक्षा उद्योगनगरीला आहे.

पवना नदीवरील रावेत बंधारा येथे शहरासह हिंजवडी, वाघोली आणि एमआयडीसीचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. शहरासाठी महापालिका प्रतिदिन ४८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीउपसा करते. हे पाणी कमी पडत असल्याने एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी विकत घेते. तरीही पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींमुळे आणि भविष्यातील पाण्याची गरज ओळखून वाढीव पाणी कोटा महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे मागितलेला आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या मतानुसार, ‘सध्याचा पाणी वापर शहरासाठी आरक्षित क्षमतेपेक्षा जास्त आहे.

लोकसंख्येनुसार लागणारे अपेक्षित पाणी व प्रत्यक्ष पाणी यात तफावत आहे. ती कमी करण्यासाठी पाणी वापर कमी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागणार आहेत. भविष्यात पवनेतून वाढीव पाणी मिळणे अशक्‍य आहे.’ 

त्यामुळे महापालिकेने शहराची तहान भागविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. त्यातील एक म्हणजे पाटबंधारे विभागाने मंजूर केलेले आंद्रा व भामा-आसखेड धरणातील अनुक्रमे १०० व १६७ एमएलडी पाणी शहरात आणणे. आंद्रातील पाणी इंद्रायणी नदीतून चिखलीपर्यंत आणणे सहज शक्‍य असल्याने महापालिकेने काम सुरू केले आहे. त्याला किमान वर्षभराचा अवधी लागणार आहे. भामा-आसखेड योजनेला शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे तूर्त त्या योजनेबाबत कार्यवाही लांबणीवर पडली आहे.

मात्र, शहरातून पाण्याची मागणी वाढू लागल्याने तातडीची उपाययोजना गरजेची आहे. त्यासाठी पुणे महापालिकेची वाघोली योजना शहराकडे लवकरच हस्तांतरित होणे अपेक्षित आहे.  

रावेत बंधाऱ्यातून वाघोलीसाठीची पाणीपुरवठा योजना महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास पुणे पालिकेने तत्त्वतः मान्यता दिलेली आहे. शिवाय, त्यांची वाघोलीसाठीची नवीन भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना मार्च अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्या योजनेचे पाणी वाघोलीकरांना मिळाल्यानंतर पवना नदीवरील वाघोली पाणीपुरवठा योजना पिंपरी-चिंचवडकडे हस्तांतरित होऊ शकते. त्यासाठी अवघ्या काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पवना नदीवरील २७ एमएलडी क्षमतेची वाघोली पाणीपुरवठा योजना मंजूर कोट्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी पुणे महापालिकेकडे केली होती. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांची भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्यानंतर वाघोली योजना आपल्याकडे हस्तांतरित होईल व शहरासाठी पाणी मिळेल. 
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com