नीरा डाव्या कालव्याच्या पाणीचोरी मुळे पिके जळण्याचा धोका

राजकुमार थोरात
रविवार, 1 एप्रिल 2018

वालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यातुन ४५ कि.मी अंतरामध्ये २०० क्युसेक पाण्याची चोरी व पाणी गळतीमुळे इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील पिके गतवर्षी सारखी या वर्षी ही जळण्याचा धोका निर्माण झाला असून पाटबंधारे विभागाने पाणी चोरी व गळती तातडीने थांबविण्याची मागणी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

वालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यातुन ४५ कि.मी अंतरामध्ये २०० क्युसेक पाण्याची चोरी व पाणी गळतीमुळे इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील पिके गतवर्षी सारखी या वर्षी ही जळण्याचा धोका निर्माण झाला असून पाटबंधारे विभागाने पाणी चोरी व गळती तातडीने थांबविण्याची मागणी इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

धरणामध्ये पुरेसा पाणी साठी असल्यामुळे चालू वर्षी नीरा डाव्या कालव्यातुन शेतकऱ्यांना दोन उन्हाळी पाण्याची आवर्तने देण्यात येणार आहेत. यातील एका आवर्तनास सुरवात झाली आहे. टेल टू हेड पद्धतीने पाण्याचे आवर्तन सुरु आहे. मात्र कालव्यातुन अनेक शेतकऱ्यांनी अनाधिकृत सायफन टाकून दररोज भरमसाठ पाणी चोरी केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी बेकायदेशीर पाणी चोरी करुन शेततळी भरण्याचा अनेक बड्या शेतकऱ्यांनी सपाटा लावल्यामुळे धिम्या गतीने सिंचन सुरु आहे. नीरा डावा कालव्याच्या उन्हाळी आवर्तनास १३ मार्च रोजी सुरवात झाली होती. मात्र नीरा परिसरात कालव्याला फुटल्याने कालव्याचे  पाणी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी पाणी सोडण्यात आले .

कालव्याच्या ५९ क्रंमाकाच्या वितरिकेमधून  २२ मार्चपासुन पाण्याचे आवर्तन सुरु आहे. आत्तापर्यत केवळ २०० हेक्टरमधील पिकांचे सिंचन झाले असून सायफनद्वारे पाणी चोरीचे प्रमाण वाढले आहे. धिम्या गतीने पाणी सिंचन सुरु राहिल्यास तालुक्याच्या पश्‍चिम भागातील  लासुर्णे, कळंब, वालचंदनगर,रणगाव,निमसाखर,शिरसटवाडी,अंथुर्णे परीसरातील शेतकऱ्यांना किमान एक महिन्यानंतर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांची सर्व पिके जळून जाण्याचा धोका  निर्माण होणार आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाचे उपभियांता आर.के.गुटूकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुमारे २२० हेक्टर क्षेत्रामधील सिंचन झाले असल्याचे सांगितले.

पाणी चोरीचा सपाटा...
नीरा डावा कालव्यामध्ये सणसरमधून ३१६ क्युसेक वेगाने, अंथूर्णे मधून २३७ क्युसेक्सने  वेगाने व   निमगाव केतकीमधील ५९ फाट्यावरती ११५ क्युसेक्सने वेगाने सुरु आहे. सुमारे ४५ कि.मी लांबीमध्ये २०० क्युसेक पाण्याची चोरी व गळत होत आहे. कालव्यालगत बड्या शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या असून कालव्यातुन सायफनद्वारे पाणी चोरी करुन विहिरीत सोडले जाते. विहिरीतील पाणी विद्युत पंपाच्या साहय्याने शेततळ्यामध्ये टाकून पाण्याची भरमसाठ चोरी केली जात असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास विलंब होत आहे. 

पाणी चोरी व गळती न रोकल्यास पिके जळ्याची भिती...
गतवर्षी पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील सुमारे सात एकरावरील पिके पाण्याअभावी जळून खाक झाली होती.शेतकऱ्यांना रास्ता रोको करुन पाणी मिळाले नव्हते. पाटबंधारे विभागाने चालू वर्षी ही पाणी चोरी व गळती न रोखल्यास यावर्षीही शेतकऱ्यावर पाण्यासाठी रस्त्यावर बसण्याची वेळ येणार आहे. 

Web Title: walchandnagar news about crops