वालचंदनगर पोलिसांनी जप्त केली 16.50 लाखांची विदेशी दारू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

वालचंदनगर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सणसर येथील जगदंबा हॉटेलवर बारामती गुन्हे शोध पथक व वालचंदनगर पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सुमारे साडे सोळा लाखांची काळ्या बाजारातील विदेशी दारू जप्त केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला मालवाहतूक  टेम्पो जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.

वालचंदनगर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सणसर येथील जगदंबा हॉटेलवर बारामती गुन्हे शोध पथक व वालचंदनगर पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सुमारे साडे सोळा लाखांची काळ्या बाजारातील विदेशी दारू जप्त केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला मालवाहतूक  टेम्पो जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.

याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी विक्रम श्यामराव भाग्यवंत (वय-३०, रा.सणसर, जगदंबा हॉटेलचा मालक) व टेम्पोचालक बबन विठ्ठल सूर्यवंशी (वय-२७) व बालाजी विठ्ठल सूर्यवंशी (वय-४२, दोघेही रा. हडपसर-फुरसुंगी) या तिघांना अटक केली आहे.  शासनाने महामार्गावरील दारूबंदी केल्यानंतर छुप्या पद्ध्तीने दारू विक्री होत होती. त्यामुळे अशा प्रकारे काळ्या बाजारातील विक्री होणाऱ्या दारूवर ठिकठिकाणी कारवाई झाली आहे. मात्र वालचंदनगर पोलिसांनी केलेली कारवाई जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई मानली जात  आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी : मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सणसर  येथील जगदंबा हॉटेलमध्ये काळ्या बाजारातील दारू येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बारामतीचे उपविभागीय  पोलीस अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस व बारामती गुन्हे शोध पथकाने सणसर येथील जगदंबा हॉटेल येथे छापा घातला. त्यावेळी या हॉटेलच्या बाजूला असलेल्या रिकाम्या खोलीत चारचाकी मालवाहतूक टेम्पोतून (एम.एच.१२ क्यूए ७३१०) वरील तिघेजण विदेशी दारूचे बॉक्स उतरवत होते. मालवाहतूक टेम्पोत वेगवेगळ्या २८ प्रकारच्या विदेशी दारूचे सुमारे ३४८ बॉक्स सापडले. त्याची १६ लाख ६३ हजार ६९४ रुपये एवढी किंमत असून त्यासोबत ३ लाख रुपये किमतीचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला. आरोपींकडे दारू बॉक्सचा परवाना नसून दारू काळ्या बाजारातून विकली जात असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.

या कारवाईत बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, स.पो.नि. उत्तम भजनावळे, स.पो.नि. चंद्रशेखर यादव, सहाय्यक फौजदार प्रभाकर बनकर, पोलीस हवालदार शिवाजी निकम, गणेश काटकर, नितीन कळसाईत, रमेश शिंदे, शरद तावरे, भोई, काळे, सानप, संदीप जाधव, प्रकाश माने यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: walchandnagar news police Foreign liquor