वाल्हेकरवाडी गृहयोजना संथच, कामाचे आदेश देऊन उलटली अडीच वर्षे

building
building

पिंपरी (पुणे) : वाल्हेकरवाडीतील स्पाइन रस्त्यालगत नवनगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येत असलेल्या 792 घरांच्या गृहयोजनेसाठी कामाचे आदेश देऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही या प्रकल्पाच्या कामाने अपेक्षित वेग पकडलेला नाही. प्रकल्पाला विलंब होत असल्याने प्राधिकरणातर्फे कंत्राटदाराला सध्या दररोज दहा हजार रुपये दंड लागू आहे. दंडापोटी कंत्राटदाराकडून प्राधिकरणाने मे अखेरपर्यंत 45 लाख रुपये वसूल केले आहेत. 

वाल्हेकरवाडी गृहयोजनेतील घरांची किंमत किती असेल, याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. मात्र, येथे स्वस्तात घरे उपलब्ध होतील, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे ही गृहयोजना कधी पूर्ण होईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. संबंधित गृहयोजनेच्या कामासाठी सात जानेवारी 2016 रोजी आदेश देण्यात आले. मात्र, राजकीय विरोधामुळे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम 6 ते 8 महिने उशिराने सुरू झाले. 

प्रकल्पासाठी 73 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी सहा जुलै 2019 पर्यंत मुदत आहे. प्रकल्पात तीन मजल्याच्या 55 इमारती उभारल्या जाणार आहेत. त्यातील 30 इमारतींचे पार्किंग स्लॅबपर्यंत, 20 इमारतींचे पायापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. दोन इमारतींचे तीन मजल्यापर्यंत काम झाले आहे. तर, दोन इमारतींचे कामच सुरू झालेले नाही. कामाला विलंब होत असल्याने प्राधिकरणाने कंत्राटदाराला 25 ऑक्‍टोंबर 2016 पासून 2 हजार रुपये तर, 6 मार्च 2017 पासून 5 हजार दंड लागू केला. दंडात वाढ करीत 6 नोव्हेंबर 2017 पासून सध्या प्रतिदिन 10 हजार रुपये दंड लागू आहे. 

दृष्टिक्षेपात गृहयोजना 
एकूण क्षेत्र : 34 हजार चौरस मीटर 
बांधकाम क्षेत्र : 27 हजार चौरस मीटर 
नियोजित इमारती : 55 
एकूण सदनिका : 792 
वन रूम किचन सदनिका (274 चौरस फूट) : 378 
वन बीएचके सदनिका (372 चौरस फूट) : 414 

"ऍल्युफोम तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या वाल्हेकरवाडी गृहयोजनेत बांधकाम सुरू आहे. त्यामुळे स्लॅब व भिंतीचे काम एकावेळी होत आहे. प्रकल्पातील प्रत्येक इमारतीत जमिनीखाली सहा हजार लिटरची टाकी, छतावर पाण्याची टाकी, सोलर वॉटर हिटर, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना चढ उताराचा त्रास होऊ नये, यासाठी जोत्यावरील (ग्राउंड लेव्हल) सदनिका दिल्या जाणार आहेत.'' 
- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, नवनगर विकास प्राधिकरण. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com