Video : पुण्यात पुन्हा इमारतीची भिंत कोसळली; धनकवडीमधील दुर्घटना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

- #PuneWallCollapse ची पुनरावृत्ती, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही.
- सकाळी पावणेसहाच्या सुमारास समोरच्या घरावर भिंत कोसळली.
- भिंत कोसळण्याची पुर्वकल्पना आल्याने घरातील कुटुंबियांनी सुरक्षित जागी हलविण्यात आले होते.

पुणे : येथील धनकवडी भागात सावरकर चौकातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळण्याची घटना आज पहाटे पावणेसहाच्या सुमासार घडली. भिंत पडणार अशी पूर्वकल्पना आल्याने आधीच येथील लोकांना सुरक्षित जागी हलविण्यात आल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मागील एक ते दीड महिन्यात भिंत कोसळण्याची ही शहरातील चौथी घटना आहे.  

तळ मजल्यालगतच असलेली ही भिंत 30 वर्ष जुनी असल्याने ही भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे येथे राहणाऱ्या कुटुबियांना इतरत्र हलविण्यात आले होते. त्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. ही भिंत 16 फूट उंच आणि 50 फूट लांब होती. 

ही भिंत असणारी आज सकाळी समोरच्या घरावर कोसळली, ज्यामुळे त्या घराचे दार बंद झाले होते. मात्र अग्मिशामत दलाच्या जवानांनी खिडकी तोडून आत प्रवेश करत कुटुंबातील सर्वांना सुखरूप बाहेर काढलं. काही दुचाकींचं मात्र या भिंतीच्या राड्यारोड्याने मोठं नुकसान झाले. 

बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ही भिंत कमकूवत झाल्याने याची पुर्नबांधणी करण्याची तयारी केली गेली होती. मात्र, पावसामुळे हे काम रखडले होते. अखेर आज ही भिंत कोसळली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A wall collapsed at Dhankawadi in Pune