'वंचित आघाडीचा युतीवर परिणाम होणार नाही'

मंगेश शेवाळकर
रविवार, 13 जानेवारी 2019

हिंगोली शहरातील कोषागार कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन तसेच पालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पालक मंत्री दिलीप कांबळे हिंगोली येथे आले होते. यावेळी नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुठे उपस्थित होते.

हिंगोली : राज्यातील आगामी निवडणूकीत सेना भाजपा युतीवर वंचित आघाडीचा कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच शिवसेना-भाजप युती होईल अशी आशा असल्याची माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी ( ता.13)  दिली आहे.

हिंगोली शहरातील कोषागार कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन तसेच पालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पालक मंत्री दिलीप कांबळे हिंगोली येथे आले होते. यावेळी नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुठे उपस्थित होते.

यावेळी बोलताना कांबळे म्हणाले की केंद्र शासनाने व राज्य शासनाने मागील साडे चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही आगामी निवडणुका लढविणार आहोत. शिवसेना व भाजपा यांची युती होईल अशी आशा आहे. त्याबाबतची वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात वंचीत आघाडी निवडणूकीत उतरणार असली तरी त्याचा भाजपावर फारसा परिणाम होणार नसल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी च्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरलेल्या  माहिती तपासणीचे काम अद्यापही सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. काही ठिकाणी दोन वेळा अर्ज भरण्यात आल्या मुळे या अर्जांच्या तपासण्या केल्या जात  असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली शहरातील रस्ते कामांसाठी  एकशे तीन कोटी रुपयांचा निधी रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून शहरातील रस्ते होणार असून परिसरातील सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग जोडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे.

हिंगोलीच्या सिंचनाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री महोदयांनी सतराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी काही निधी उपलब्ध झाला असून टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध करून देत हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Wanchit Bahujan alliance will not be affected On Sena BJP alliance