पुण्यात सव्वातीनशे "वॉंटेड' गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

गणेशोत्सव, विधानसभा निवडणुका व दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर गेले अडीच महिने विशेष मोहीम राबवून स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केली. 

पुणे - शहराच्या विविध भागांतील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या व पोलिसांना पाहिजे असलेल्या (वॉंटेड) सव्वातीनशे आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. गणेशोत्सव, विधानसभा निवडणुका व दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर गेले अडीच महिने विशेष मोहीम राबवून स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केली. 

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 2018 या वर्षाच्या अखेरपर्यंत विविध पोलिस ठाण्यांच्या अभिलेखावर  "वॉंटेड' असलेल्या आरोपींची संख्या अडीच हजार इतकी होती. त्यामध्ये 67 जणांची फरारी म्हणून नोंद करण्यात आली होती. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त बच्चन सिंह यांनी संबंधित आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेस दिले होते. विशेषतः गणेशोत्सव, विधानसभा निवडणूक आणि दिवाळी शांततेत पार पाडण्यासाठी अडीच महिन्यांपूर्वी  या आरोपींवर पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली होती. यासाठी स्थानिक पोलिस व गुन्हे शाखेने "विशेष तपास पथक' स्थापन केले होते. 

या पथकामार्फत गुन्हेगारांची तपासणी करून तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे माहिती घेऊन त्यांचा माग काढत आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यामध्ये स्थानिक पोलिसांनी 287, तर गुन्हे शाखेने 22 आरोपींना गजाआड केले. विमा कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकून दोन कोटी रुपयांची रक्कम चोरणारा व नऊ वर्षांपासून फरार असलेला संजय गंभीर या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली. याबरोबरच बनावट कागदपत्रांद्वारे बॅंकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिपीन मुरलीधर पाटील यालाही गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. 

वर्षानुवर्षे होते फरार 
गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये येरवडा परिसरात सराफी दुकानावर दरोडा टाकणाऱ्या व 22 वर्षांपासून "वॉंटेड' असलेल्या विलास ऊर्फ अविनाश भालेराव यास अटक केली. चतु:शृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात वीस वर्षांपासून "वॉंटेड' असलेला आरोपी बुद्धिवान ऊर्फ विजय जाधव यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 19 वर्षांपासून फरार असणारा व घरफोडी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार संजय कांबळे यालाही अटक करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wanted criminal arrested in Pune