पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रभागरचना (वॉर्ड) होणार लवकरच जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election commission

पुणे जिल्ह्यातील ३०४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेली प्रभागरचना (वॉर्ड) येत्या २४ मेपर्यंत अंतिम करण्याचा आणि २७ मे रोजी ही अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचा आदेश

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची प्रभागरचना (वॉर्ड) होणार लवकरच जाहीर

पुणे - पुणे जिल्ह्यातील (Pune District) ३०४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Grampanchyat Election) आवश्‍यक असलेली प्रभागरचना (वॉर्ड) (Ward Structure) येत्या २४ मेपर्यंत अंतिम करण्याचा आणि २७ मे रोजी ही अंतिम प्रभागरचना जाहीर करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाचे (State Election Commission) सचिव किरण कुरुंदकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिला आहे. दिलेल्या मुदतीत ही प्रभागरचना अंतिम करण्यासाठी ग्रामपंचायत प्रभागरचनेचा याआधीचा अर्धवट कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यास आयोगाने परवानगी दिली आहे.

या परवानगीमुळे याबाबत नव्याने हरकती सूचना न मागविता, याआधी प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी मंगळवारपासून ग्रामपंचायत प्रभागरचनेच्या हरकतींवर सुनावणी घेण्यास सुरवात केली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत (ता.१३) ही सुनावणी पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेतून मंगळवारी (ता.१०) देण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाने याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये या ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा आणि आरक्षण निश्‍चितीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार प्रारूप प्रभागरचना जाहीर करून, त्यावर हरकती व सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. हरकती, सूचना मागविण्याची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करत, पंचायतराज संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे अधिकार राज्य सरकारकडे घेतले होते. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निवडणूक आयोगाने सुरु केलेली ग्रामपंचायत प्रभाग रचनेचा कार्यक्रम स्थगित केला होता. तेव्हापासून या कार्यक्रमाची स्थिती जैसे थे होती, असेही यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, पंचायतराज संस्थांच्या निवडणुकीचे अधिकार पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोगाकडे आल्यानंतर निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत प्रभाग रचनेचा पूर्वी स्थगित केलेलाच कार्यक्रम पुढे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची आयोगाने तत्काळ अंमलबजावणी सुरु केली आहे.

या प्रभागरचनेत पुणे जिल्ह्यातील जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या दोन वर्षात मुदत संपुष्टात येत असलेल्या २८६ आणि नव्याने स्थापन झालेल्या १७ अशा एकूण ३०३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची ही पहिलीच प्रभागरचना असणार आहे. उर्वरित २८६ पैकी २०२१ मध्ये मुदत संपलेल्या ५८ आणि डिसेंबर २०२२ अखेर पर्यंत मुदत संपुष्टात येत असलेल्या २२८ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या

 • आंबेगाव --- ३९

 • बारामती --- १५

 • इंदापूर --- ३०

 • शिरूर --- १०

 • दौंड --- ०८

 • भोर --- ५६

 • वेल्हे --- २८

 • मावळ --- १०

 • मुळशी --- १२

 • पुरंदर --- ०२

 • जुन्नर --- ५३

 • खेड --- २८

 • हवेली --- १२

प्रभागरचना वेळापत्रक

 • हरकती, सूचनांवर सुनावणी घेणे --- १३ मे २०२२

 • हरकतींवर जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय घेणे --- १९ मे २०२२

 • प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देणे --- २४ मे २०२२

 • अंतिम प्रभागरचना जाहीर करणे --- २७ मे २०२२

Web Title: Ward Structure For Grampanchayat Elections In Pune District Will Be Announced Soon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top