"बीआरटी'चे वॉर्डन हरवले! 

ज्ञानेश सावंत 
रविवार, 30 डिसेंबर 2018

पीएमपीला महापालिकेकडून वर्षाकाठी ठराविक रक्कम दिली जाते. मात्र, काही कामात नियमितता नसेल तर त्याची माहिती मागविण्यात येईल. बीआरटी मार्ग, त्यांची स्थिती आणि तेथील यंत्रणेचा आढावा घेऊ. जादा वॉर्डनची नेमणूक झाल्यास त्याची चौकशी करू. 

- योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती 

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटी सेवेचे मार्ग ः पाच. त्यांचे एकूण अंतर ः 60 किलोमीटर. मार्गांची अवस्था ः कल्पना न केलेली बरी... मार्गांत बसपेक्षा खासगी वाहनेच सुसाट धावतात! मग, या मार्गांवर वॉर्डन नसावेत का, या प्रश्‍नाचा शोध घेतला असता "बीआरटी' मार्गांवर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच वॉर्डन असल्याचे दिसून आले. तथापि, पीएमपीच्या दप्तरी मात्र, तब्बल सव्वातीनशे वॉर्डनची नोंद आहे. म्हणजे, या मार्गांवर प्रत्येक किलोमीटर अंतरावर पाच वॉर्डन नेमल्याचे दाखविले आहे. प्रत्यक्षात मात्र तशी वस्तुस्थिती नसल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले. 

मग, वॉर्डनच्या पगारासाठीचा खर्च पाहिला, तर त्याचा आकडा चक्रावून टाकणारा दिसला. त्यांच्या पगारापोटी महिन्याला 52 लाख, तर वर्षाला 6 कोटी 24 लाख रुपये मोजल्याचा हिशेब आहे. मुळात, तोट्यात असलेली पीएमपी केवळ वॉर्डनसाठी एवढा खर्च करीत असेल, तर अन्य कामांवरील खर्चाच्या आकड्यांची कल्पनाच न केलेली बरी. पाच बीआरटी मार्गांवर जेमतेम शंभरही वॉर्डन दिसत नसताना त्यांची संख्या मात्र 238 पर्यंत फुगली आहे. तेव्हा, हे लोक आहेत तरी कुठे, आणि त्यांच्या नावाचा पगार कोणाच्या खिशात जातो, हे सांगायला नको. या वॉर्डनच्या नेमणुका चार-सहा महिन्यांपासून नाही तर, त्या गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासूनच्या आहेत. म्हणजे, गेल्या तीन वर्षांत त्यांच्यासाठी 18 कोटी 72 लाख खर्च झाला आहे. 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी बीआरटीला पसंती देण्यात आली. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. पहिल्या टप्प्यात 117 किलोमीटर लांबीचा मार्ग सुरू करण्याचे नियोजन झाले. वाहनांची वर्दळ असलेल्या पुणे-सातारा रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रकल्प सुरू झाला आणि फसलाही. मूळ नियोजनातील म्हणजे, 117 पैकी साधारणत: 30 किलोमीटरचा बीआरटी मार्ग आजघडीला सुरू नाही. तरीही त्याच्या देखभालीसाठी पीएमपी व्यवस्थापणाने 238 वॉर्डन नेमले आहेत. 

पुणे-पिंपरी-चिंचवडमधील बीआरटी मार्ग 

अंतर 
50 किलोमीटर 

रोजचे उत्पन्न 
प्रवासी संख्या 

वॉर्डन 
238 

पगारावरील खर्च (महिन्याकाठचा) 
52 लाख
 

Web Title: Warden of BRT not in Service