#ClassroomOnWheels वारीमध्ये अन्न विक्रेत्यांसाठी 'क्‍लासरूम ऑन व्हील्स' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पुणे - वारीमध्ये सहभागी प्रत्येक वारकऱ्याबरोबरच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ निश्‍चित मिळावेत, यासाठी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. याअंतर्गत अन्न सुरक्षेसाठी यावर्षी दोन्ही पालखी मार्गावर प्रथमच "क्‍लासरूम ऑन व्हील्स' हा प्रकल्प अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) राबविण्यात येणार आहे. 

पुणे - वारीमध्ये सहभागी प्रत्येक वारकऱ्याबरोबरच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या दर्जाचे अन्न पदार्थ निश्‍चित मिळावेत, यासाठी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. याअंतर्गत अन्न सुरक्षेसाठी यावर्षी दोन्ही पालखी मार्गावर प्रथमच "क्‍लासरूम ऑन व्हील्स' हा प्रकल्प अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) राबविण्यात येणार आहे. 

पालखी मार्गावरील अन्न सुरक्षेसाठी फक्त कारवाईचा बडगा न उगारता रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी प्रबोधनाचा राज्यातील पहिला प्रयोग गेल्या वर्षी सुरू झाला. फिरत्या प्रशिक्षण वर्गातून विक्रेत्यांना खाद्यपदार्थ आणि परिसराच्या स्वच्छतेचे निकष समजावून सांगण्यात येतात. गेल्या वर्षी हा प्रयोग संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये पुणे ते नीरा या दरम्यान राबविण्यात आला. या प्रयोगाच्या यशानंतर यावर्षी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्येही "क्‍लासरूम ऑन व्हील्स' राबविण्यात येत आहे, अशी माहिती "एफडीए'च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली. कोका-कोला इंडिया आणि नेस्ले कंपनीतर्फे पालखी मार्गावर "क्‍लासरूम ऑन व्हील्स' राबविण्यात येत आहे. त्यासाठी खास बस तयार करण्यात आली आहे. आळंदी ते नीरापर्यंतच्या मार्गात असलेल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना या बसमधून अन्न सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात येईल. 

असे दिले जाते प्रशिक्षण 
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षणासाठी सुमारे अर्ध्या तासाचे मॉड्यूल तयार करण्यात आले आहे. त्यात स्टॉल्सवरील स्वच्छता, खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्याची साफसफाई, स्टॉल्सच्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत याची माहिती साध्या-सोप्या भाषेत विक्रेत्यांना दिली जाते. या प्रशिक्षणानंतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना हातमोजे, टोपी, रुमाल दिले जातात. तसेच, त्यांना हे प्रशिक्षण शिबिर पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही दिले जाते. 

पालख्यांच्या पुढे या दोन्ही बस असतील. त्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांना स्वच्छता, अन्न सुरक्षा, सकस खाद्य पदार्थांची विक्री याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. "क्‍लासरूम ऑन व्हील्स'च्या गेल्या वर्षीच्या यशामुळे यावर्षी त्याची व्यापी वाढविण्यात आली आहे. 
- शिवाजी देसाई, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग 

Web Title: Wari food sailer awakening classroom on wheels FDA