वारीपूर्वी होणार काँक्रिटीकरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

पिंपरी - म्हाळसाकांत चौक-आकुर्डी गावठाण ते पुणे-मुंबई महामार्गावरील खंडोबा माळ चौकापर्यंत संत तुकाराम महाराज पालखीमार्गावरील अतिक्रमणे हटवून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी पालखीमार्ग सोयीचा होणार असून, पालखी सोहळा शहरात दाखल होण्यापूर्वी काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेचे आहे.

पिंपरी - म्हाळसाकांत चौक-आकुर्डी गावठाण ते पुणे-मुंबई महामार्गावरील खंडोबा माळ चौकापर्यंत संत तुकाराम महाराज पालखीमार्गावरील अतिक्रमणे हटवून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने साडेआठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी पालखीमार्ग सोयीचा होणार असून, पालखी सोहळा शहरात दाखल होण्यापूर्वी काँक्रिटीकरण पूर्ण करण्याचे नियोजन पालिकेचे आहे.

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू येथून पंढरपूरला जात असतो. पालखी रथापुढे २५ व रथामागे सुमारे पावणेतीनशे दिंड्या असतात. सोहळ्यात सुमारे दोन लाखांवर वारकरी भाविक सहभागी असतात. देहू येथून पालखी प्रस्थान झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाचा मुक्काम आकुर्डी गावठाणातील विठ्ठल मंदिरात असतो. त्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील निगडीतील टिळक चौकातून प्राधिकरण कॉर्नर, दत्तनगर, विठ्ठलवाडी मार्गे सोहळा मंदिरात मुक्कामी पोचतो. सोहळ्याची तिसऱ्या दिवसाची वाटचाल पहाटे पाच वाजता मंदिरापासून सुरू होते. साधारणतः सव्वा किलोमीटर अंतर आल्यानंतर सोहळा पुन्हा पुणे-मुंबई महामार्गाने पुण्याकडे मार्गस्थ होतो. महामार्ग प्रशस्त असल्याने सोहळा विनाअडथळा मार्गक्रमण करीत असतो. मात्र, निगडीतील टिळक चौकापासून आकुर्डी गावठाणमार्गे खंडोबा माळपर्यंतचा पालखी मार्ग खूपच अरुंद व बाजारपेठेतून असल्याने वारकऱ्यांना दाटीवाटीने चालावे लागते. शिवाय पालखी शहरात दाखल होते. त्या दिवशी व शहरातून पुण्याकडे मार्गस्थ होण्याच्या दिवशी शहरातील हजारो भाविक आकुर्डीत दर्शनासाठी येतात. त्यामुळे पालखी मार्गावर गर्दी वाढत असल्याने गेल्या वर्षी टिळक चौकापासून विठ्ठल मंदिरापर्यंतची अतिक्रमणे हटवून पालखी मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात आले. परिणामी, मंदिरापर्यंतचा मार्ग प्रशस्त झाला आहे. आता मंदिरापासून खंडोबा माळपर्यंत आणि मंदिरापासून प्राधिकरणातील म्हाळसाकांत चौकापर्यंत काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याला स्थायी समिती सभेने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे. 

दीर्घकाळ मार्ग टिकेल
जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वर्षानुवर्षे आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असतो. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढते आहे. त्यामुळे पालखी मार्गाचे काँक्रिटीकरण सर्वांसाठी सोयीचे होणार आहे. काँक्रिटचा मार्ग होणार असल्याने तो दीर्घकाळ टिकेल, असे मत देहू संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

Web Title: Wari road concrete