यंदा वारकऱ्यांचा निवारा हरविणार

प्रसाद पाठक
गुरुवार, 17 मे 2018

पुणे - संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी यंदा महापालिकेच्या खर्चातून वारकऱ्यांसाठी शहरात कोठेही मांडव उभारता येणार नाहीत. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वारकऱ्यांच्या सुरक्षित निवाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. गणेशोत्सवासह अन्य उत्सव, जयंती, पुण्यतिथीसाठीही हा निर्णय लागू झाला आहे. या पूर्वी शहराच्या वेगवेगळ्या भागांत महापालिका सुमारे २०० हून अधिक ठिकाणी मांडव उभारत होती. 

खासगी व्यक्तींनी आयोजित केलेले सण, उत्सवात मांडव, प्लॅटफॉर्म, किंवा खाण्यापिण्यासाठी महापालिकेने खर्च करू नये, असे उच्च न्यायालयाने महापालिकेला एका आदेशाद्वारे बजावले आहे. त्यामुळे यंदा मांडव न टाकण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. महापालिकेतर्फे दरवर्षी भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ आदी विविध ठिकाणी १४७ मांडव टाकले जातात. त्या साठीची निविदा प्रक्रिया सुरू करण्याची मागणी नगरसेविका सुलोचना कोंढरे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना महापालिकेने विधी विभागाने दिलेल्या सल्ल्याचा संदर्भ देत यंदा मांडव टाकले जाणार नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे पालख्यांच्या मुक्कामाच्या परिसरात दरवर्षी वास्तव्य करणाऱ्या काही वारकऱ्यांना सुरक्षित निवारा कसा उपलब्ध करून द्यायचा, असा प्रश्‍न कोंढरे यांनी प्रशासनापुढे उपस्थित केला आहे. तर या बाबत मार्ग काढण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्‍वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे. 

भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर येथे संत ज्ञानेश्‍वरांची, तर नाना पेठेतील निवडुंगा विठोबा देवस्थान येथे संत तुकाराम महाराजांची पालखी दरवर्षी मुक्कामी येते. या पालख्यांसोबत सुमारे ३-४ लाख वारकरी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी शहरात येतात.

वारकऱ्यांसाठी मांडव उभारता येणार नसल्याने अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. जुलै महिन्यात पावसाळा असतो. मांडव घातला नाही, तर ऐन पावसात वारकऱ्यांची सोय कशी करणार? मांडव व्यवस्था करण्याबाबत योग्य निर्णय त्वरित घेतल्यास लाखो वारकऱ्यांची गैरसोय टळेल.
- तेजेंद्र कोंढरे, अध्यक्ष पालखी विठ्ठल मंदिर, भवानी पेठ 

मांडव नसल्यास दिंडीसोबत नसणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोयच होणार आहे. ऐनवेळेस धर्मशाळा, महापालिकेच्या शाळा तरी उपलब्ध कशा होणार, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
- आनंद पाध्ये, व्यवस्थापक, निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थान, नाना पेठ

Web Title: warkari palkhi sohala residence municipal