पीएमपी बस "गॅस'वर 

pmt.jpg
pmt.jpg

पुणे : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पीएमपीसमोर आता सीएनजी पुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पीएमपीला सीएनजी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (एमएनजीएल) 34 कोटी रुपयांचे बिल थकले आहे. ही रक्कम तत्काळ न भरल्यास सीएनजीचा पुरवठा थांबविण्यात येईल, असा इशारा एमएनजीएलने दिला आहे. त्यामुळे पीएमपीची दैनंदिन सेवा विस्कळित होण्याची चिन्हे आहेत. 

थकबाकीची रक्‍कम आवाक्‍याबाहेर गेल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे एमएनजीएलकडून सांगण्यात आले. पीएमपीच्या ताफ्यातील 1235 बस सीएनजीवर चालतात. या बससाठी एमएनजीएलकडून दररोज सुमारे 30 लाख रुपयांचा सीएनजी पुरवठा केला जातो. मागील काही महिन्यांपासून सीएनजीचा पुरवठा करूनही पीएमपीने एमएनजीएलचे बिल थकवलेले आहे. याबाबत एमएनजीएलने पीएमपीला कळविले होते. त्यानंतर पीएमपीने काही रक्कम जमा केली. मात्र, तरीही सुमारे 34 कोटींची थकबाकी असून, ती एमएनजीएलला सोसणे आवाक्‍याबाहेर जात आहे. 

''पीएमपीकडून सीएनजी पुरवठ्याची थकीत रक्कम वेळोवेळी एमएनजीएलला दिली जाते. पीएमपीने एमएनजीएलला नुकतेच 5 कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित रक्कमदेखील लवकरच देण्यात येईल.''
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी 

''एमएनजीएललाही गॅस खरेदी केलेल्या कंपनीला वेळोवेळी पैसे द्यावे लागतात. अशा परिस्थितीत पीएमपीकडून थकविण्यात आलेली रक्कम मोठी आहे, त्यामुळे एमएनजीएलला गॅस खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. व्यवहार सुरळीत चालण्यासाठी करारात ठरल्याप्रमाणे रक्कम पीएमपीने वेळोवेळी द्यावी.''
- संतोष सोनटक्के, वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com