वाशेरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण 

वाशेरे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण 

कडूस : वाशेरे (ता. खेड) येथील पाटेवाडी, चिमटेवाडीसह गणेशनगर, चिंचेचा डोह या वाड्या-वस्त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी पंचायत समितीकडे पाण्याच्या टॅंकरसाठी दिलेला प्रस्ताव तहसीलदार कार्यालय स्तरावरील संयुक्त तपासणीच्या लालफितीत धूळ खात पडून आहे, त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी रानोमाळ वणवण सुरू आहे. 

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात वाशेरे गाव आहे. गावालगतच्या डोंगरापलीकडे चासकमान धरणाचा जलसाठा आहे. परंतु, गावाच्या विखुरलेल्या वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

गावाच्या आजूबाजूच्या डोंगरालगत सुमारे दोनशे लोकवस्तीची चिमटेवाडी, अडीचशे लोकसंख्येची गणेशनगर ठाकरवस्ती, दोनशे लोकवस्तीची पाटेवाडी व दीडशे लोकवस्तीची तळपेवस्ती आहे. या वाड्या-वस्त्यांना डिसेंबर महिन्यापासून पाणीटंचाईने ग्रासले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या वस्त्यांतील नागरिक पाणीटंचाईच्या समस्येशी झगडत आहेत.

मे महिन्यात तर टंचाईची तीव्रता आणखीनच वाढली आहे. वर्षभर या वस्त्यांची तहान स्थानिक विहिरींच्या माध्यमातून भागवली जाते; परंतु या विहिरींतील पाण्याने डिसेंबरमध्येच तळ गाठल्याने वस्त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून भाषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. महिला, शालेय विद्यार्थ्यांसह घरातील पुरुष मंडळींना दोन ते चार किलोमीटर अंतरावरून मिळेल त्या ठिकाणावरून पाणी आणावे लागत आहे. 

या वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी ग्रामपंचायतीने 13 मार्च रोजी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवला आहे. पंचायत समितीने त्याच दिवशी हा प्रस्ताव संयुक्त तपासणीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे सादर केला. परंतु, तहसीलदार कार्यालय स्तरावरून होणारी संयुक्त तपासणी मे महिना उजाडला तरी झाली नाही. संयुक्त तपासणी झाल्यानंतर प्रांत कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी जातो. वाशेरे ग्रामपंचायतीने दिलेला प्रस्ताव गेल्या दीड महिन्यापासून तहसीलदार कार्यालय स्तरावरील संयुक्त तपासणीच्या लालफितीत धूळ खात पडून आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पावसाळ्याच्या अगोदर मिळणार की नाही, असा प्रश्न पडला आहे. 

आंदोलनाचा इशारा 
याबाबत वाशेऱ्याचे माजी सरपंच उल्हास कुडेकर म्हणाले, ''अनेक गावांचे टॅंकर मागणीचे प्रस्ताव आले आहेत. आमच्या गावचासुद्धा प्रस्ताव दिला आहे. जाणूनबुजून दाबून ठेवलेले प्रस्ताव गेल्या दोन महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. परंतु, याकडे कोणीच लक्ष देत नाही. शासकीय यंत्रणा सुस्त झाली असून, त्याचा फटका आदिवासी भागातील टंचाईग्रस्त जनतेला बसत आहे. तालुक्‍याची अवस्था आंधळं दळतंय अन्‌ कुत्रं पीठ खातंय, अशी झाली आहे. दोन दिवसांत गावाला टॅंकर सुरू झाला नाही तर पंचायत समितीसमोर उपोषण आंदोलन करणार आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com