कचरा उचलला जात असल्याचा पालिकेचा दावा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

डेपोला लागलेली आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरू

डेपोला लागलेली आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरू
पुणे - फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील कचरा डेपोतील आग आटोक्‍यात न आल्याने सोमवारीही शहरातील कचरा उचलण्यात आला नाही. मात्र, प्रक्रिया प्रकल्पांच्या क्षमतेनुसार काही भागांतील कचरा उचलण्यात येत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. ओला आणि सुका (एकत्रित) कचरा उचलण्यात येत असून, त्यासाठी जादा मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत आग आटोक्‍यात येईल, त्यानंतर बुधवारी सकाळपासून कचरा उचलून तो डेपोत नेला जाईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले.

शहराच्या विविध भागांतून दिवसभरात सुमारे चारशे टन ओला आणि सुका कचरा गोळा केला असून, त्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाने सांगितले.

कचरा डेपोला आग लागल्याने तेथे कचरा टाकणे बंद करण्यात आले असून, आग धुमसत असल्याने तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी कचरा उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे काही भागातील कचराकुंड्या भरून वाहत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होऊ नये, यासाठी त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. म्हणून विविध प्रकल्पांमध्ये कचरा नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातच, नव्याने काही प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, त्यामुळे कुंड्यांमधील कचरा लगेचच हलविण्यात येत आहे. त्याबाबत क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नियोजन केले आहे, अशी माहिती महापालिकेच्या सहायक आयुक्त ऍलिस पोरे यांनी दिली.

त्या म्हणाल्या, 'ओला आणि सुका (एकत्रित) कचरा उचलून त्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. त्यानंतर तो प्रक्रिया प्रकल्पांमध्ये पाठविला जात आहे. ज्या भागातील कुंड्यांमध्ये कचरा अधिक आहे, तोही उचलण्यात येत आहे. त्यामुळे शहरात कचरा पडून नाही. डेपोतील आग आटोक्‍यात आणण्याचे काम सुरू असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत ती आटोक्‍यात येईल. त्यानंतर येथे कचरा नेला जाईल.''

Web Title: Waste being picked up that claim Corporation