‘रोकेम’ कचऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

दुरुस्तीसाठी हा प्रकल्प गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याचे प्रकल्प व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

पुणे - वीजनिर्मितीच्या दृष्टीने आखलेला रोकेम कचराप्रक्रिया प्रकल्प बंद पडला आहे. तो बंद होऊन दोन-अडीच महिने उलटूनही तो सुरूच असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे. त्यामुळे प्रकल्प बंद पडल्यानंतर तो चालविणाऱ्या ठेकेदाराला महापालिकेने पैसे मोजले का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, दुरुस्तीसाठी हा प्रकल्प गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याचे प्रकल्प व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिकेने खासगी कंपनीच्या माध्यमातून हडपसरमधील रामटेकडीत २०११ मध्ये रोकेम प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाची क्षमता दररोज साडेसातशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची असताना गेल्या आठ वर्षांत तो केवळ दररोज अडीचशे ते तीनशे टन क्षमतेने चालविण्यात आला. या प्रकल्पाचा मूळ उद्देश वीजनिर्मिती होता. हा उद्देश पूर्ण न करता आल्याने ठेकेदारानेही तो पूर्ण क्षमतेने करण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यातच गेल्या तीन वर्षांत तो अनेकदा बंद पडला. 

सुमारे दहा महिन्यांपूर्वी प्रकल्पात अचानक आग लागल्याने दीड महिना तो बंद ठेवण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर संबंधित ठेकेदारावर कारवाई करीत त्याची बिले अडवून ठेवण्यात आली होती. तेव्हाच प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्‍यता होती. परंतु, करार आणि कायदेशीर बाबींमुळे तो तग धरून होता. प्रकल्पातील मुख्य यंत्रणेतच बिघाड झाल्याने जेमतेम शंभर टन कचऱ्यावरही प्रक्रिया करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे तो अखेर बंद करण्यात आला आहे.

३५० रुपये  प्रतिटन कचऱ्यावर प्रक्रियेसाठी ठेकेदाराला मिळणारे पैसे 

रोकेम प्रकल्पात 
काही किरकोळ दुरुस्ती करण्यात येत आहेत. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही. 
तो लवकरच सुरू होईल, त्याची क्षमता वाढविण्यात  येणार आहे. 
- ज्ञानेश्‍वर मोळक, प्रमुख, घनकचरा व व्यवस्थापन विभाग, महापालिका 

कचरा डेपो  बंद होणार? 
शहरातील जवळपास १ हजार ६०० टन कचऱ्यावर येत्या डिसेंबरपर्यंत दररोज प्रक्रिया होईल. त्यानंतर एक टनही कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी कचरा डेपोत टाकणार नाही, असे महापालिकेने सांगितले आहे.  तीनशे टन क्षमतेचा नोबेल बंदच पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे डेपो बंद होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: waste processing project in Hadapsar is closed