सांडपाणी वाहिन्या तुंबल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

येरवडा कारागृह, मनोरुग्णालय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात

वडगाव शेरी - कारागृह आणि मनोरूग्णालय परिसरातील शासकीय वसाहतीच्या सांडपाणी वाहिन्या व मैलापाणी वाहिन्या तुंबल्या आहेत. सांडपाणी वाहून जात नसल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच पुणे महापालिकेने सांडपाणी वाहिनीचे काम करण्याची तयारी दाखविल्यानंतर त्या कामाला अडथळे आणण्याचा प्रयत्न मनोरुग्णालयाकडून सुरू आहे. 

येरवडा कारागृह, मनोरुग्णालय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात

वडगाव शेरी - कारागृह आणि मनोरूग्णालय परिसरातील शासकीय वसाहतीच्या सांडपाणी वाहिन्या व मैलापाणी वाहिन्या तुंबल्या आहेत. सांडपाणी वाहून जात नसल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच पुणे महापालिकेने सांडपाणी वाहिनीचे काम करण्याची तयारी दाखविल्यानंतर त्या कामाला अडथळे आणण्याचा प्रयत्न मनोरुग्णालयाकडून सुरू आहे. 

येरवडा कारागृहाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या मैलापाण्यासाठी कारागृह परिसरात मैलापाण्याच्या टाक्‍या बांधल्या आहेत. या टाक्‍या आणि मनोरुग्णालय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील सांडपाणी वाहिन्याही जुन्या झाल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी सांडपाणी व मैलापाणी तुंबून ते कर्मचाऱ्यांच्या घरात येऊ लागले आहे. तसेच मैलापाणी मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या मैदानात साचले असून, ते पुढे नाल्यातून उघड्यावर वाहत आहे. 

‘सकाळ’ने शुक्रवारी दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी मनोरुग्णालय कर्मचारी वसाहतीतील महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग या वाहिन्यांची दुरुस्ती करीत नाही आणि त्यांच्याकडे तशी यंत्रणा नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
यातून मार्ग काढण्यासाठी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पालिकेने येथे सांडपाणी वाहिन्या टाकाव्यात, अशी सूचना केली होती. त्यानुसार पालिकेने निविदा काढून ठेकेदाराला काम दिले. मात्र आता मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांनी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरू झालेल्या कामावर हरकत घेतली आहे. वाहतूक शाखेची नाहरकत आणा, राज्याच्या आरोग्य संचालकांची परवानगी आणा, सार्वजनिक बांधकाम खात्याचे ‘ना हरकत’ पत्र आणा, असे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यामुळे हे काम थांबले आहे.  मनोरुग्णालय अधीक्षकांशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम थांबविलेले नाही. मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांनी ‘ना हरकत’ पत्र मागितल्यास आम्ही ते देऊ. महापालिका काम करीत असेल, तर आमची हरकत नाही.
- उज्ज्वला घावटे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

कारागृह आणि मनोरुग्णालय दोन्ही विभागांच्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयी देणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे. त्यांच्याकडून ते होत नाही आणि महापालिकेलासुद्धा ते करू देत नाहीत. सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम मनोरुग्णालयाने अडवू नये. स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा तरी त्यांनी विचार करावा. हे काम नाल्याच्या कडेने होणार आहे. नाल्याचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ व हरित लवादाच्याही तशा सूचना आहेत. 
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक

Web Title: waste waterline block