इंदापूर तालुक्याचा खरीप हंगाम वाया?

इंदापूर तालुक्याचा खरीप हंगाम वाया?

कळस -  जुलै महिना उलटत आला तरी इंदापूर तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी खरीपातील पेरणीचे प्रमाण घटले असून, आतापर्यंत सरासरीच्या केवळ 15 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यातील भिगवण व काटी भाग वगळता इतरत्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पालखीसोबत पाऊस येतोच असे ठामपणे भाकित वर्तवणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंदाजावरही पाणी पडले आहे. यामुळे यंदा खरीप हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात दरवर्षी 11 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपातील पिकांच्या पेरण्या होत असतात. यामध्ये प्रामुख्याने मका, बाजरी या तृणधान्यांबरोबर तूर, मूग, उडीद 
यांसारख्या कडधान्यांचाही समावेश असतो. शेतकरी सर्वांधिक पसंती मका पिकाला देत असून, जनावरांच्या चाऱ्याबरोबरच चार पैसे हाताशी लागत असल्याचा त्यांचा आजवरचा अनुभव आहे. या तुलनेत बाजरी पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट होत असल्याचे आढळून येत आहे. 

शिवाय फळबाग व उस लागवडीखालील क्षेत्र वाढल्यानेही खरीपातील पेरण्यांवर याचा परिणाम दिसून येत आहे. यंदा मोसमीपूर्व पावसाने एकदा-दोनदा हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांच्या पावसाविषयीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, यानंतर अद्यापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचे खरीपाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी उस लागवडीवर भर दिला आहे. यामुळे उसाच्या क्षेत्रामध्य़े वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.  

याबाबत तालुका कृषी अधिकारी सूर्यभान जाधव म्हणाले, खरीपाचा तालुका म्हणून इंदापूर तालुक्याची ओळख आहे. दरवर्षी सरासरीपेक्षाही अधिक क्षेत्रावर खरीपातील पेरण्या होत असतात. यंदा मात्र वेळेत समाधानकारक पाऊस न झाल्याने सरसरीच्या केवळ 15 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. 7 जून ते 30 जुलै हा खरीपातील पेरणीचा कालावधी आहे. मात्र यापुढेही पाऊस झाला तरी सरासरीएवढ्या क्षेत्रावर यंदा पेरण्या होणे शक्य नाही. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्या दाखल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com