esakal | गस्तीवरील पोलिसांवरच ठेवणार ‘वॉच’; कसा ते पहा

बोलून बातमी शोधा

Police
गस्तीवरील पोलिसांवरच ठेवणार ‘वॉच’; कसा ते पहा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर बॉडी कॅमरे असलेल्या २४ पोलिसांची तुकडी गुरुवारपासून तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानकावरील परिस्थितीचे आपोआप चित्रीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गंभीर आरोपांमुळे २२ कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली केली आहे.

पुणे लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दल यांचे प्रत्येकी १२ अधिकारी-कर्मचारी यांचा या पथकात समावेश आहेत.

पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, फौजदार, सहायक फौजदार आणि हवालदार, शिपाई आदी दर्जाचे पोलिस त्यात आहेत. त्यांच्या खांद्यावर किंवा छातीवर कॅमेरे असतील. गस्त घालताना कॅमेरे सुरू ठेवणे बंधनकारक असेल. त्यामुळे गस्तीचे चित्रिकरण आपोआप त्यात होणार आहे, अशी माहिती रेल्वे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी दिली. प्रवाशांशिवाय आजूबाजूच्या वस्तीतील काही युवक रेल्वे स्थानकावर फिरत असतात. त्या पकडण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान गुरुवारपासून ही पथके कार्यान्वित झाली आहेत. गस्ती दरम्यान कार्यपद्धती कशी असावी, याबाबत पथकाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे रेल्वे पोलिस सुरक्षा दलाचे आयुक्त उदयसिंह पवार यांनी स्पष्ट केले.

पुणे रेल्वे स्थानकावर गावी परतणाऱ्या मजुरांना पोलिस धमकावून त्यांच्याकडून पैसे घेतात, अशा प्रसंगाचे चित्रीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियातूनही व्हायरल झाले होते. त्यामुळे स्थानकावरील २२ कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बुधवारी बदली करण्यात आली. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांनाही समज देण्यात आली आहे. मनसेचे कार्यकर्ते निखिल काची यांनी या बाबत पुणे विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर बॉडी कॅमेरे असलेले पोलिस पुणे रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान मोरे यांनी केलेल्या चित्रीकरणाची पाहणी करण्यात आली आहे. त्यात पोलिस नागरिकांना धमकावून पैसे घेत असल्याचे कोठेही आढळून आलेले नाही, असेही वायसे पाटील यांनी स्पष्ट केले. तर, पोलिस मजुरांना धमकावून त्यांच्याकडून बळजबरीने पैसे घेतात असे मोरे यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: फेक अकाउंटवरून शरद पवार यांना धमकी

पोलिसांवरील आक्षेप

  • स्थानकावर लोहमार्ग पोलिस कर्मचारी प्रवाशांचे मोबाईल तपासतात

  • त्यात अश्लील व्हिडिओ किंवा छायाचित्र आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देतात

  • बॅगा तपासणी करण्याच्या बहाण्याने अडवणूक करतात

  • अशिक्षित मजुरांचे आधार कार्ड, पॅन कार्ड मागतात

  • मजुरांना कारवाईची भीती दाखवितात

मनसे म्हणते...

गावी परतणाऱ्या मजुरांना पोलिस जिन्याखाली घेऊन जातात. तेथे त्यांच्याकडील आधार कार्ड, पॅन कार्डची तपासणी करतात. त्या वेळी गाडीत बसायचे असेल तर, पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास गाडीत बसू दिले न जाण्याची धमकी देतात, त्यामुळे घाबरून मजूर पैसे देऊन निघून जातात. काही मजुरांनी याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांना कळविले होते. मोरे यांनी त्याबाबत चित्रीकरण करून ते पोलिसांना दिले आहे.