सकाळ, ॲग्रिकल्चरलच्या साथीने ९ गावे ‘पानी’दार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

बारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. जिल्ह्यात संयुक्तपणे ३० गावांत झालेल्या कामांपैकी नऊ गावांनी जिल्ह्यात पारितोषिकावर आपले नाव कोरले.

बारामती - सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने पुणे जिल्ह्यात पाणीदार झालेल्या गावांनी पानी फाउंडेशनच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. जिल्ह्यात संयुक्तपणे ३० गावांत झालेल्या कामांपैकी नऊ गावांनी जिल्ह्यात पारितोषिकावर आपले नाव कोरले.

पानी फाउंडेशनच्या स्पर्धेतील स्पर्धक गावांना रविवारी (ता.१२) पुण्यात पारितोषिके वितरित करण्यात आली. यात बारामती तालुक्‍यात सावंतवाडी, पानसरेवाडी व कटफळ या गावांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. इंदापूर तालुक्‍यात लामजेवाडी, सराफवाडी व काटी या गावांनी आणि पुरंदर तालुक्‍यात पोखर, पानवडी व सुकलवाडी या गावांना पारितोषिके मिळविली. यामधील काटी वगळता इतर सर्व गावांत जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातून सकाळ रिलीफ फंड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बारामती ॲग्रोमार्फत ओढा, तलाव खोलीकरणाची कामे झाली. लाखो रुपयांची कामे या गावात झाल्याने गावांतील पाणीसाठ्याची क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढली. या गावांत शारदानगर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही श्रमदान केले आणि महत्त्वाचे म्हणजे या गावांतील लोकसहभाग वाढण्यासाठी ट्रस्टच्या वतीने अनेकदा ग्रामस्थांच्या बैठका घेऊन ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यात आले. संस्थांची मदत, लोकसहभाग आणि ग्रामस्थांच्या एकीतून ही गावे पाणीदार बनली. या गावातील एकीचा गौरव यानिमित्ताने झाला. स्पर्धा हे निमित्त ठरले, परंतु या निमित्ताने गावांमधील एकीही वाढली आणि दुष्काळावर मात करण्यासाठी स्पर्धेतील नियमांचा आधारही ग्रामस्थांनी घेत स्वयंशिस्त तयार केली. 

लोक एकत्र आले की, काहीही घडू शकते. सकाळ रिलीफ फंड, बारामती ॲग्रो आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने या गावांना बळ दिले. शारदानगर शैक्षणिक संकुलातील हजारो विद्यार्थी अनेक गावांत श्रमदानात सहभागी झाले. हे सामूहिक यश त्या गावांना पुढील काळातही दुष्काळावर मात करण्याची प्रेरणा देत राहील. फक्त या गावांचा आदर्श इतरही गावांनी घेतला पाहिजे. 
- सुनंदा पवार, विश्वस्त, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती 

Web Title: water in 9 village by Sakal Agriculture