वाचा दिलासादायक बातमी : पुण्याची मुळा-मुठा होतेय स्वच्छ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

भारतासह जगभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व शहरातील दैनंदिन जीवनावर परिणाम होऊन मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असला तरी पर्यावरणावर त्याचा सकारात्मक बदल झाला आहे.

पुणे - लॉकडाऊनचा देशातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊन मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असला तरी पर्यावरणावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. या काळात मुळा-मुठा नदीतील प्रदूषणात घट झाली आहे की नाही?, यासाठी महापालिकेने काही नमुने घेतले होते. याच्या चाचणीनुसार पाण्यातील जैविक ऑक्‍सिजनचे प्रमाण (बीओडी) सुमारे 50 टक्के तर रासायनिक ऑक्‍सिजनचे प्रमाण (सीओडी) सुमारे 42 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जल प्रदूषणात तीन घटक पाण्याची गुणवत्ता दर्शवितात. यामध्ये पाण्यात विरघळलेला ऑक्‍सिजन (डिओ), बीओडी आणि सीओडीचा समावेश आहे. व्यावसायिक (मॉल्स्‌, सुपर मार्केट्‌स), शहरातील लघु उद्योग, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌, गॅरेज, खासगी कार्यालये, हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌, शाळा व कॉलेजपासून तयार होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही घट दिसून आली, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख मंगेश दिघे यांनी दिली. 

पिंपरीच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►  क्लिक करा

ध्वनी प्रदूषणातही घट 
पुणे शहरातील निवासी, व्यावसायिक आणि शांतता क्षेत्रांची लॉकडाऊन पूर्वी तसेच लॉकडाऊन दरम्यान ध्वनी प्रदूषण गुणवत्ता मोजण्यात आली. रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ, व्यावसायिक व रहिवासी भागांतील गर्दी यामुळे होणारा आवाज कमी झाल्याने ध्वनी पातळी कमी झाल्याचे दिसून आले आहे. स्वारगेटसारख्या अति वर्दळीच्या चौकातील ध्वनीची पातळी 91 डीबी (डेसिबल) पासून कमी होऊन 67 डीबीपर्यंत आल्याचे दिघे यांनी सांगितले. 

Image may contain: text

युवा शेतकऱ्याने लॉकडाऊनच्या काळात केली तीन लाख रुपयांची कमाई

असा झाला बदल 
(मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन अगोदर आणि एप्रिल 2020 मध्ये) 
मुळा-मुठा नदीतील पाण्याची गुणवत्ता (मिली.ग्रॅ./लिटरमध्ये) 
घटक : लॉकडाऊन पूर्वी : लॉकडाऊन नंतर 
बीओडी : 61.32 : 32.09 
सीओडी : 159.68 : 67.7 
डीओ : 3.19 : 4.6 

ध्वनी प्रदूषणात घट (डेसीबलमध्ये) 
(मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन अगोदर आणि एप्रिल 2020 मध्ये) 

क्षेत्र : लॉकडाऊन पूर्वी लॉकडाऊन नंतर 
व्यावसायिक/औद्योगिक : 74.56 66.55 
रहिवासी भाग : 49.75 47.48 
शांततेचे भाग : 49.53 47.11 

बीओडी म्हणजे काय ? 
- पाण्यातील जैविक पदार्थाच्या प्रदूषणाचा मापदंड म्हणून बीओडीचा वापर 
- अशुद्ध पाण्यातील जैविक पदार्थांच्या विघटनासाठी सुक्ष्मजंतूना किती मिलिग्रॅम ऑक्‍सिजनची आवश्‍यकता आहे, यावरून पाण्यातील बीओडीचे प्रमाण मोजले जाते 
- बीओडीचे प्रमाण जेवढे कमी, तेवढे ते पाणी चांगल्या गुणवत्तेचे मानले जाते 
- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) ठरवून दिलेल्या मानकानुसार बीओडीची पातळी 30 मिली.ग्रॅ./लिटर इतकी असावी 

पुणे जिल्ह्यातील 'या' गावाची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने...

सीओडी म्हणजे काय ? 
- पाण्यातील रासायनिक पदार्थाच्या प्रदूषणाचा मापदंड म्हणून सीओडीचा वापर केला जातो 
- अशुद्ध पाण्यातील रासायनिक पदार्थाचे विघटन करण्यासाठी ऑक्‍सिजनची किती आवश्‍यकता आहे, यावरून सीओडीचे प्रमाण मोजले जाते 
- पाण्यातील सीओडीचे प्रमाण जेवढे कमी, तेवढी पाण्याची गुणवत्ता अधिक चांगली 
- सीपीसीबीने ठरवून दिलेल्या मानकानुसार सीओडीची पातळी 150 मिली.ग्रॅ./लिटर इतकी असावी 

कोरोनाची प्रत्येक बातमी ठरतेय पुणेकरांसाठी महत्त्वाची; कारण...

पाण्यात विरघळलेला ऑक्‍सिजन (डीओ) 
- पाण्यातील डीओचे प्रमाण जेवढे जास्त, तेवढे ते पाणी चांगल्या गुणवत्तेचे 
- डीओचे एकक मिली.ग्रॅ./लिटर असे आहे 
- विरघळलेला ऑक्‍सिजन कमी झाला तर जलसृष्टीची वाढीची क्षमता कमी होते 

लॉकडाऊनच्या काळात आठवड्याला एकदा असे सुमारे 10 ठिकाणांवरून मुळा मुठा नदीतील पाण्याचे नमुने घेतले. या सर्व नमुन्यांची चाचणी करून सरासरीचा आकडा काढला. सध्या घरातील सांडपाण्याच्या प्रमाणात कोणतीच घट झाली नाही. परंतु उद्योग, शाळा, महाविद्यालय हे क्षेत्र बंद असल्याने हा बदल दिसून आला आहे. त्याचबरोबर शहरातील औद्योगिक, निवास व शांततेचे क्षेत्र या ठिकाणी डेसिबल मीटर या यंत्राचे वापर करून ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजली आहे. 
- मंगेश दिघे, पर्यावरण विभाग प्रमुख, पुणे महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water and noise pollution also decreased during lockdown pune