पुणे कॅंटोन्मेंटमध्ये लवकरच 'वॉटर एटीएम'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

नोव्हेंबरअखेर उपलब्धता : मोफत की अल्पदर याबाबत निर्णय नाही

पुणे - पुणे कॅंटोन्मेंटमधील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठीची "वॉटर एटीएम'ची सुविधा नोव्हेंबरअखेरीस मिळणार आहे. कॅंटोन्मेंटच्या आठही वॉर्डमध्ये "वॉटर एटीएम' बसविले जाणार आहेत. ही सुविधा मोफत की अल्पदरात द्यायची, यासंदर्भातील निर्णय अद्याप बोर्ड प्रशासनाने घेतलेला नाही; मात्र अत्यंत अल्पदरातच ही सुविधा देण्याकडे बहुतांश बोर्ड पदाधिकाऱ्यांचा कल आहे.

कॅंटोन्मेंटच्या शाळा, व्यापारी केंद्र, प्रमुख रस्ता आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी "वॉटर एटीएम' सुविधा देण्यासंदर्भात मागील वर्षी मान्यता मिळाली होती;
परंतु बोर्ड प्रशासनाने पाण्याची नमुने तपासणी आणि निविदा प्रक्रिया राबविण्यातच संपूर्ण वर्ष घालविले. यासंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ए. के. त्यागी यांनी "वॉटर एटीएम'चे काम कुठे अडकले आहे, असा प्रश्‍न बोर्डाच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर ही प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्यासह बोर्डाच्या सर्व सदस्यांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

पाण्याची नमुने तपासणी व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन कंपन्यांनी ही सुविधा देण्यासाठी निविदा दाखल केल्या आहेत. त्यापैकी एका कंपनीची निवड करण्यात येणार आहे. याबाबत ब्रिगेडिअर त्यागी म्हणाले, ""लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी ही सुविधा देण्याविषयी मागील वर्षी मान्यता दिली होती. या कामास उशीर झाला आहे. तरीही ही सुविधा लवकर उपलब्ध करून द्यावी. या सुविधेसाठी काही प्रमाणात पैसे आकारल्यास त्याची किंमत लोकांना कळेल. त्याचबरोबर यंत्राची निगा राखण्याचेही काम होऊ शकेल.''

"वॉटर एटीएम'द्वारे मिळणाऱ्या पाण्यासाठी अल्पदर आकारण्यास सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. बोर्डाचे सदस्य अतुल गायकवाड यांनी मात्र पैसे आकारण्यास विरोध दर्शविला आहे. गायकवाड म्हणाले, ""कॅंटोन्मेंटमध्ये राहणारे बहुतांश नागरिक गरीब आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागणे, हे चुकीचे आहे. ही सुविधा मोफत दिल्यास कोणीही त्यापासून वंचित राहणार नाही; मात्र त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.''

Web Title: Water ATM in Pune Cantonment