आधी "वॉटर बजेट'; मग कोटा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) 
गतवर्षी - 23.46 
या वर्षी - 18.48 
(दोन्ही वर्षांची 20 डिसेंबरअखेरची स्थिती) 

पुणे - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार शहराची नेमकी लोकसंख्या किती, पाण्याचा एकूण वापर आणि पाणीगळती यासह एका महिन्यात "वॉटर बजेट' सादर करावे. त्यानंतर शहराचा पाणीकोटा ठरविण्यात येईल, असे जलंसपदा विभागाने पुणे महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे शहराच्या पाणीकोट्याबाबत अजूनही अनिश्‍चितताच असल्याचे दिसून येत आहे. 

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार महापालिकेला वर्षाला 8.19 टीएमसी पाणीकोटा मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार शहरासाठी महापालिकेने दररोज 692 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलणे अपेक्षित आहे. परंतु, शहरासह लगतच्या गावांतील वाढती लोकसंख्या, अन्य भागातून शहरात येणारे नागरिक आणि पाणीगळती यामुळे महापालिकेला दररोज सरासरी 1300 एमएलडी पाणी घ्यावे लागत आहे. 

महापालिकेने खडकवासला धरणातून गुरुवारी (ता. 20) 1226 एमएलडी पाणी उचलले. शहराला किमान 11.50 टीएमसी पाणी द्यावे, अशी महापालिकेची मागणी आहे. मात्र, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानंतर महापालिकेला अधीक्षक अभियंता यांच्याकडे "वॉटर बजेट' सादर करण्यास सांगितले आहे. ते सादर केल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिकेने "वॉटर बजेट'मध्ये काटकसरीचे धोरण अवलंबत सुधारित माहिती दिल्यास शहराचा पाणीकोटा वाढवून मिळण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

पिण्याबरोबर शेतीलाही पाणी 
यंदा खडकवासला प्रकल्पामध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा पाच टीएमसीने कमी आहे. रब्बी पिकांसाठी पाण्याचे आवर्तन नुकतेच बंद करण्यात आले आहे, त्यामुळे जलसंपदाकडून कालवा दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पुन्हा साधारण 15 दिवसांनंतर रब्बीच्या पिकांचे आवर्तन सुरू होईल. शहराच्या पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीला पाणी देण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाला पार पाडावी लागणार आहे. 

पुणे शहराला जादा पाणीसाठा देण्यासंदर्भात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काही निकष ठरवून दिल्यानुसार पाणीसाठ्याची मागणी करण्यात येत आहे, ज्यामध्ये लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक असेल. त्यासंदर्भातील अभ्यास करून पुढील आठवड्यात अहवाल मांडण्यात येणार आहे. मात्र, पुणेकरांना पुरेसे पाणी मिळेल, यादृष्टीने नियोजन करण्यात येईल.
- सौरभ राव, आयुक्त, पुणे महापालिका

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला सुधारित ‘वॉटर बजेट’ सादर करण्यास सांगितले आहे. त्यात पुणे शहर, लगतच्या गावांतील लोकसंख्या, बाहेरून येणारे नागरिक, उद्योगांसाठी पाण्याचा एकूण वापर आणि पाणीगळती या बाबींचा समावेश असेल. एका महिन्यात हे बजेट अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर करायचे आहे, त्यानुसार पाण्याचा कोटा ठरविण्यात येईल. 
      - टी. एन. मुंडे, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये) 
गतवर्षी ः 23.46 
या वर्षी ः 18.48 
(दोन्ही वर्षांची 20 डिसेंबरअखेरची स्थिती) 

Web Title: Before the water budget and then quota