निम्म्या शहरावर पाण्याचे संकट 

निम्म्या शहरावर पाण्याचे संकट 

पुणे - उजवा मुठा कालवा फुटल्याने लष्कर आणि पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला मोठा फटका बसणार आहे. या दोन्ही केंद्रांवर अवलंबून असलेल्या शहराच्या जवळपास निम्म्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. २८) विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. कालवा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. ते पूर्ण होईपर्यंत लष्कर पाणीपुरवठा केंद्रावर अवलंबून असलेल्या भागाला किमान दोन-तीन दिवस कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

लष्कर जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत कोंढवा, मुंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, येरवडा, कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगाव शेरी, चंदननगर, नगर रस्ता, विमाननगर आदी परिसरासह पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून प्रामुख्याने शहराच्या मध्यभागातील पेठा, इंदिरानगर, बिबवेवाडी, सहकारनगर, पद्मावती, मार्केट यार्ड, सिंहगड रस्ता आदी भागाला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरही काही प्रमाणात परिणाम होईल. दरम्यान, जलसंपदा विभागाने कालवा दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. दोन दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर शेतीसाठी आवर्तन सुरू ठेवण्याचा निर्णय होईल. या घटनेमुळे कालवा सल्लागार समितीची शुक्रवारी होणारी बैठक रद्द केली आहे. कालवा दुरुस्तीच्या कामावर बारकाईने लक्ष असून, त्याबाबत जलसंपदा विभाग आणि महापालिकेला सूचना दिल्या आहेत, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.

लष्कर पाणीपुरवठा केंद्रावर अवलंबून असणाऱ्या भागाला पुढील दोन दिवस कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होईल. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. पर्वती केंद्रांतर्गतही काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो. 
- व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे महापालिका

गळतीकडे काणाडोळा
कालव्यातील पाण्याची गळती होत असल्याने १६ ठिकाणी दुरुस्ती करावी लागणार असल्याचे पाटबंधारे खात्याने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच, त्यासाठी चार कोटी रुपयांचा प्रस्तावही तयार केला. प्रत्यक्षात मात्र पावणेदोन वर्षात त्यावर कार्यवाहीच झाली नाही. त्यामुळे वर्षाकाठी एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी वाया जात असतानाच कालव्यालगतची भिंत कोसळण्यामागे दुरुस्तीकडे झालेला काणाडोळाही जबाबदार आहे. दुरुस्तीचा खर्च पाटबंधारे की महापालिकेने करायचा, हा वादही पालकमंत्र्यांसमोर झाला होता. 

कालव्यात जागोजागी खड्डे पडल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचे बापट यांच्यासह पाटबंधारे खाते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले होते. ही पाहणी एप्रिल २०१६ मध्ये केली होती. पाण्याची गळतीच नव्हे, तर विद्युत मोटरींच्या माध्यमातून पाण्याची चोरी होत असल्याचेही पालकमंत्र्यांनी पाहिले होते. त्यातच कालवा देखभाल-दुरुस्तीकडे एकाही यंत्रणांनी लक्ष दिले नाही. परिणामी, पाणीगळतीचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. तेव्हाच, १२ ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करण्याचा आदेश बापट यांनी पाटबंधारे खात्याला दिला होता. कालव्यातील गाळही काढणे अपेक्षित होते. 

मात्र, याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. कालव्याची गळती रोखण्यासाठी नेमकी कोणती कामे करणे अपेक्षित आहे, याची पाहणी करून अहवाल पाठविण्याची सूचना बापट यांनी केली होती. त्यानुसार दुरुस्तीचे नियोजन होते. मात्र, ती कामे झाली नसल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले. 
 

ई सकाळवरील उजवा मुठा कालव्या संबधित व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

अहवालाचा अधिकाऱ्यांना विसर 
तीन-चार वर्षांत पुण्यात पाण्याची स्थिती गंभीर होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पाणीटंचाईवर उपाय म्हणून गळती रोखण्यावर भर देण्यात येईल, असे बापट यांनी कालवा पाहणीनंतर सांगितले होते. पाणीचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कालव्यातून भूमिगत वाहिनी टाकता येईल का?, यादृष्टीने अभ्यास करून अहवाल देण्याची सूचनाही केली होती. तज्ज्ञांबरोबर चर्चा करून या वाहिनीचा विचार करू, असे पाटबंधारे खात्याने सांगितले होते. त्याचाही विसर पडल्याचे दिसून येत आहे. 

काहीच राहिलं नाही... सगळं वाटोळं झालंय... कालच औषधं आणली होती, तीही वाहून गेलीत... मीच फक्त वाचले. घरात जवळपास चार फूट पाणी होतं. त्यात घराचं मोठं नुकसान झालं आहे. घरातील भांडी, तेल, अन्नधान्य सगळं वाहून गेलं. पाणी आलं, तेव्हा घरात केवळ मीच होते. आजारी असल्याने काल दवाखान्यात जाऊन आले. हजार रुपयांची औषधं आणली होती, ती सगळी वाहून गेली. 
- तुळजाबाई गायकवाड

दहा- बारा दिवसांपूर्वीच फ्रिज विकत घेतला; पण घरात आज पाणी आलं आणि सगळंच वाहून गेलं. वहिनी, आई आणि पुतण्या घरात होते. पाणी आलं आणि घराचं होत्याचं नव्हतं झालं. घरातील साहित्याचंही नुकसान झालं आहे. 
- सुधीर अभ्यंकर

या वस्तीमध्ये माझे किराणा मालाचे दुकान आहे. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे नाल्याची संरक्षक भिंत पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी घरामध्ये शिरले, त्यातच नाल्याच्या कडेला असलेल्या दुकानाची मागील भिंत पाण्याच्या रेट्याने पडली, त्यामुळे दुकानात पाणी शिरून सर्व वस्तू वाहून गेले. काही काळात बाकीच्या भिंतीही पडल्या. आता फक्त दुकानाची पाटी लावलेली एकच भिंत उभी आहे.
- राजू निकसे, गॅरेजचे मालक 

सकाळी साडेअकराच्या सुमारास वस्तीत पाणी आल्याने सर्वत्र एकच कल्लोळ माजला. काही कळायच्या आत नागरिकांच्या घरात पाणी शिरले, ज्याला जसे जमेल तसे आम्ही येथून बाहेर पडलो. घरे, घरातील साहित्य डोळ्यांसमोरून वाहून जात होते, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आम्ही पाहण्याशिवाय काही करू शकत नव्हतो.
- अच्चीत भोसले, स्थानिक रहिवासी

सकाळी मुलींना शाळेत सोडण्यासाठी निघालो होतो. त्या वेळी त्या भागात पाणी झिरपत होतं. मुलींना शाळेत सोडून परत आलो तर कालव्याला भगदाड पडलं होतं. पाणी यायला सुरवात झाली होती. चौकात येऊन येथे ड्यूटीवर असलेल्या पोलिसांना सांगितलं. मित्रांना आणि इतर सहकाऱ्यांना घेऊन मदतकार्यास सुरवात केली. आमच्या घरातदेखील पाणी शिरलं. 
- राहुल कदम, स्थानिक रहिवासी

रोजच्याप्रमाणे वाहतूक नियमन सुरू होतं. पण अकराच्या सुमारास अचानक चौकात पाणी येण्यास सुरवात झाली. सुरवातीला एखादा चेंबर फुटला असेल असं वाटलं; पण पाणी वाढतच गेलं आणि हे काहीतरी वेगळं असेल म्हणून पाहिलं. तोपर्यंत कालवा फुटल्याचं लक्षात आलं. त्यानंतर नियंत्रण कक्षाला कळवलं. या वेळी माझ्यासोबत जी. एस. बिराजदार, दिलीप जाधव, जयदास शिंदे आदी होते.  
- चंद्रकांत बोराडे, वाहतूक पोलिस

माझ्या मुलांची वह्या व पुस्तकं वाहून गेलीत. त्याचबरोबर घराचं नुकसान झालं आहे. घरातील साहित्याचंही नुकसान झालं आहे.
- अरुण शेलार, स्थानिक रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com