esakal | पुण्यात भाजप आमदाराचा मनसे नगरसेवकावर 'पाणी'राग
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात भाजप आमदाराचा मनसे नगरसेवकावर 'पाणी'राग

सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पाण्यावरून राजकारण पेटत आहे. पुण्यातील भाजपच्या एका आमदाराने शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील पाणी रोखण्याचे फर्मान महापालिका अधिकाऱ्यांना सोडले आहे.

पुण्यात भाजप आमदाराचा मनसे नगरसेवकावर 'पाणी'राग

sakal_logo
By
ज्ञानेश सावंत

पुणे : विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्याच्या हेतूने राजकीय पक्षांत आडवाआडवीचे राजकारण रंगत असतानाच पुण्यात मात्र, सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पाण्यावरून राजकारण पेटत आहे. पुण्यातील भाजपच्या एका आमदाराने शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील पाणी रोखण्याचे फर्मान महापालिका अधिकाऱ्यांना सोडले आहे.

सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा शब्द पाळून अधिकाऱ्यांनी शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागांत पाणीकपात लादल्याचे रविवारी उघड झाले आहे. आमदाराच्या दबावामुळेच ही पाणीकपात केल्याचे अधिकारी उघडपणे बोलत आहेत. त्यामुळे गणशोत्सवासह आता सणासुदीचा काळ सुरू झाली तरी, शहराच्या काही भागांतील पाणीकपात कायम राहणार असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. विशेषत: सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांच्या वादामुळेच या भागांतील लोकांवर पाणीकपातीचे विघ्न आले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराला रोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही वडगाव जलकेंद्रातर्गंतच्या  सिंहगड रस्ता, कात्रज, कोंढव्यासह आजुबाजुच्या परिसराचा पाणीपुवरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात त्यामुळे या भागातील लोकांना गेल्या काही दिवसांपासून ऐन पावसाळ्यात पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. 
त्यातच, सोमवारपासून (ता.2) गणेशोत्सावाला सुरवात होत असून, त्यानंतर गौरी, नवरात्रोत्सव आहे. त्यामुळे सणासुदीत लोकांना पुरेसे पाणी देण्याऐवजी ते कमी केले जात आहे.

या पाणीकपातीमागे तांत्रिक करण असून, नियोजनाचा भाग म्हणूनच ती करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी करीत आहेत. प्रत्यक्षात मात्र, हडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील राजकारणामुळे ही पाणीकपात लादण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेषत: शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक असलेल्या भागांतील लोकांना पाणी पुरेशी पाणी मिळणार नाही, याची काळजी भाजपच्या नेत्याने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या दाबावाला बळी पडूनच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वडगाव केंद्रात कपातीचा प्रयोग सुरू केला असून, तो यशस्वी असल्याचे दाखवून आता पुढील किमान तीन-चार महिने तरी, कपात कायम ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम म्हणाले, "तांत्रिक कारणामुळेच वडगाव केंद्रातर्गंत एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवत येत आहे. मात्र, कपात नाही. पुढील निर्णय होईपर्यंत हे नियोजन कायम राहील.

loading image
go to top