#waterCrisis पाण्यासाठी दमछाक

Water Crisis
Water Crisis

पुणे - महापालिकेने केलेल्या पाणीकपातीमुळे उपनगरांत एकच वेळ पाणीपुरवठा होत आहे, मात्र एक वेळ आणि तेही कमी दाबाने पाणी येत असल्याने महिलांची दमछाक होत आहे. काही भागात पाणीपुरवठा सुरळीत सुरू असला, तरी काही ठिकाणी मात्र रहिवाशांना वणवण करावी लागत आहे.

शास्त्रीनगरमध्ये कमी दाबाने पाणी 
पौड रस्ता - शास्रीनगर, मोकाटेनगर, साईनाथ वसाहत, कुंबरे चाळ, गाढवे कॉलनी, हमराज गणपती आदी भागात कमी दाबाने पाणी येत असल्याने महिलांची दमछाक होत आहे. दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यापर्यंत पाणी चढत नसल्याने या रहिवाशांना खाली उतरून पाणी भरण्याची कसरत करावी लागत आहे. 

या परिसरात दुमजली-तीन मजली इमारतींची संख्या जास्त आहे. ज्यांच्याकडे पाणीसाठा करण्यासाठी तळमजल्यावर टाकी आहे, ते मोटारीने पाणी वर चढवतात; पण ज्यांच्याकडे टाकीची सोय नाही, त्यांचे हाल होत आहेत. विशेषतः प्यायचे पाणी भरण्यासाठी ताण होतो. पाणी एक वेळ दिले तरी चालेल; पण किमान पुरेशा दाबाने पुरवठा करा, अशी मागणी महिला करीत आहेत. साईनाथ वसाहतीतील प्रज्ञा घडशी म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे पहाटे पाच ते नऊ या वेळेत पाणी येते; परंतु ते टाकीत चढत नाही. सध्या तरी पुरेसे पाणी मिळते; पण पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.

सोसायट्यांतील नागरिक त्रस्त
कोथरूड - पुणे शहरामध्ये पाणीकपात सुरू झाल्यानंतर कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, महात्मा सोसायटी, पटवर्धन बाग, एरंडवणे आदी भागांतील अनेक सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिका आणि स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही. परिणामी, नागरिकांना पुरेसे पाणी दोन्ही दिवस उपलब्ध झाले नाही. गेल्या पाच वर्षांपूर्वी लागू झालेल्या पाणीकपाती वेळी कोथरूड भागामधील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागला होता. 

या पाश्वर्भूमीवर यंदाच्या पाणीकपातीच्या काळात महापालिकेने काळजी घेऊन पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी कोथरूडकर नागरिकांनी केली आहे.

पद्‌मावती, पर्वतीत वणवण
सहकारनगर - सलग पाच तास पाणी धोरण महापालिकेने जाहीर केले असले, तरी पहिल्या दिवसापासूनच महिलांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पर्वती दर्शन, पद्मावती, सहकारनगर, चव्हाणनगर, महर्षीनगर, मुकुंदनगर, संभाजीनगर, लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, महात्मा फुले वसाहत या भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून, एकवेळ पाणी येत असून, तेही कमी दाबाने पाणी येते. तर काही भागात पाणीच मिळत नाही. अशी सध्या परस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे. ऐन दिवाळीत ही समस्या भेडसावल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. 

पर्वती दर्शन येथील सोना डोलारे म्हणाल्या, ‘‘रविवारी माझ्या मुलीचा साखरपुडा होता. पाणी न आल्याने नातेवाइकांची तारांबळ उडाली. अखेर खासगी टॅंकर मागविण्यात आला.’’

गुलटेकडी येथील स्वप्ना मोरे म्हणाल्या, वस्तीमध्ये पाणी येत नसून जवळपासच्या ओळखीच्या घरी जाऊन पाणी घेऊन यावे लागते आहे.’’

एरंडवण्यात बोअरचा वापर
एरंडवणे - केळेवाडी भागात सकाळी दोन ते तीन तासच पाणी येते. त्यामुळे जेवढा वेळ पाणी येते तेवढ्या वेळात काम सोडून महिलांना पाणी भरावे लागते. काही सोसायट्यांमध्ये सकाळी किंवा दुपारी दोन ते तीन तास पाणी येते. काही सोसायट्यांमध्ये बोअरची सोय आहे. त्यामुळे

महानगरपालिकेच्या पाण्याची कपात असली तरीही बोअरिंग असल्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थित होतो. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. काही ठिकाणी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे तारांबळ उडत आहे. 

केळेवाडीमध्ये पहाटे पाच वाजता पाणी येते. सकाळी आठपर्यंत तीन तास पाणी असते. पहाटे पाणी येत असल्याने लवकर उठून पाणी भरावे लागते. पाणी अतिशय कमी दाबाने येत असल्याने पुरवठा होत नाही. त्यामुळे आमची तारांबळ उडत आहे.
- पूजा नलावडे, केळेवाडी

गोखलेनगर, वडारवाडी परिसरात संध्याकाळी पाणी येत आहे. सध्या पाण्याची काही समस्या नाही. पाणी जास्त दाबाने व पुरेसे आहे.
- संदीप गायकवाड, ज्ञानेश्वर मंदिर चौक 

रात्रीपासून पाणीपुरवठा योग्य दाबाने होत असून, पूर्वीपेक्षा जास्त दाबाने पाणी येऊ लागले आहे. पाण्याबाबत काही तक्रार करायची असल्यास संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर क्षेत्रीय कार्यालयातील सूचना फलकांवर लावावेत. 
- उमेश वाघ, जनवाडी

वस्त्यांमधील रहिवाशांची गैरसोय
बिबवेवाडी - परिसरात दिवसातून एक वेळच पाणीपुरवठा सुरू केला आहे; परंतु एक वेळचे पाणीसुद्धा वेळेत येत नसून, पहाटेच्या वेळी कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. दिवाळीसाठी घरात साफसफाईची कामे सुरू असून, त्यासाठी पाणी लागत आहे; परंतु दिवसातून एकच वेळ पाणी येत असून, पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरवठा केला जात आहे. सोसायट्यांमध्ये पाण्याच्या टाक्‍या असल्यामुळे पाणी साठविले जाते; परंतु वस्त्यांमध्ये पाणी साठविण्याची कोणत्याही उपाययोजना नसल्यामुळे नागरिकांना पाणी साठवता येत नाही. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही.

वस्त्यांमध्ये सकाळी रोज पहाटे पाच वाजता येणारे पाणी सहा किंवा साडेसहाच्या सुमारास सोडले जात असून, आठ वाजता बंद केले जात आहे. बिबवेवाडी ओटा, पापळवस्ती, शिवतेजनगर, अप्पर ओटा , अप्पर, डॉ. बाबसाहेब आंबेडकरनगर, डायसप्लॉट, ढोलेमळा, गावठाण व परिसरातील सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. सणासुदीत महापालिकेने पूर्ण वेळ पाणी देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

घोरपडीतील वेळेत बदल 
घोरपडी : बी. टी. कवडे रस्ता परिसरात पाणीकपातीनंतर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. काही ठिकाणी पाणीपुरवठ्याच्या वेळेचे नियोजन बदलले आहे; परंतु पाणीटंचाई नाही. बालाजीनगर परिसरात दोन वेळ पाणी येत असून, पूर्वीपेक्षा कमी दाबाने पाणी येत आहे. तसेच भीमनगर परिसरात पाणीपुरवठ्याची वेळ कमी केली असून, पंचशीलनगर परिसरात दिवसभर पाणीपुरवठा सुरू आहे. डोबरवाडी आणि लष्कर परिसरात कमी दाबाने पुरवठा होत आहे. घोरपडी बाजार आणि गावात सुरळीत पुरवठा सुरू आहे; पण कमी दाबाने पाणी येत आहे. कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे गृहिणीची कामे खोळंबत आहेत.

वारज्यातील पठाराला झळ
वारजे - वारजे भाग हा सोसायट्या, पठार तसेच झोपडपट्टीचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागात काही सोसायट्या सोडल्या तर अनेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत आहे. मात्र पठारावर तसेच रामनगरमधील काही भागांत पाण्याची कमतरता दिसून येते.

वारज्यातील गोकुळनगर, सहयोगनगर पठार व रामनगर भागांत पाणी दिवसा व कमी दाबाने येत असल्याने रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. भरदुपारी व संध्याकाळी पाच-सहाच्या दरम्यान पाणी येते. त्या वेळी अनेक नागरिक नोकरी, शाळेनिमित्त घराबाहेरच असतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. सोसायट्यांमध्ये मात्र पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. मात्र येथील झोपडपट्टी पठारावरील भागांमध्ये पाण्याची टंचाई जास्त प्रमाणात दिसून येते.महामार्गाच्या सेवा रस्त्यालागत असणाऱ्या पॉप्युलरनगर, अतुलनगर, रुणवाल सोसायटी, गार्डन सोसायटी, शोभापुरम सोसायटी, मेघवर्षा सोसायटी, तेजोलय सोसायटी अशा अनेक सोसायट्यांत पाणीपुरवठा सुरळीत आहे.

आमच्या सोसायटीत १६४ फ्लॅट आहेत. पालिकेच्या पाणीकपातीचा आमच्या सोसायटीवर काहीही परिणाम झाला नाही. तरीसुद्धा आम्ही पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच वाहन धुण्यासाठी पाणी वापरू नये, अशी सूचना रहिवाशांना दिली आहे. 
- संजय सोळंकी, अध्यक्ष, शोभापुरम सोसायटी

औंधमध्ये सुरळीत पुरवठा 
औंध - प्रभाग क्रमांक आठमधील औंध, बोपोडी औंध रस्ता परिसरातील पाणीपुरवठा समाधानकारक असल्याचे चित्र नागरिकांच्या प्रतिक्रियेतून दिसून आले. औंधमधील पाणीपुरवठ्यातील वेळेत बदल झाला असला तरीही पुरवठा सुरळीत चालू आहे. आवश्‍यक तेवढा पुरवठा होत असल्याने नागरिकांनी कुठलीही तक्रार याबाबत केलेली नाही. आजच्या पाहणीत औंध रस्ता परिसरातील पडळवस्ती परिसरात चोवीस तास पाणी चालू असल्याचे दिसून आले. 

औंध परिसरात पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात जरी बदल झाला असेल तरी सध्या होणारा पाणीपुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे आता तरी पाण्याच्या संदर्भात कुठलीही अडचण भासत नाही
- नीता जवळेकर, औंध.

खडकीत परिस्थिती ‘जैसे थे’
खडकी - पाणीकपात लागू झाली असली तरी येथील पाणीपुरवठ्याची स्थिती ‘जैसे थे’च आहे. मुळा रस्ता, वाकडेवाडी, न. ता. वाडी आदी काही भागांत पाणीपुरवठा अनियमित; तर काही भागात कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, खडकी कॅंटोन्मेंट हद्दीत पाण्याचा काहीसा प्रश्न सुटल्याचे चित्र आहे. गेली तीन चार दिवस पाणीपुरवठा सुरळीत व तीन चार तास होत असल्याने नागरिक समाधानी आहेत. पाणीप्रश्नासाठी येथील नागरिक, लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे हा प्रश्न काही प्रमाणात सुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com