पुणे शहरात पाणी कपात कायमची रद्द

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारीही धरणांमध्ये समाधानकारक पाऊस
water
watersakal

पुणे - पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारीही धरणांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने २० टीएमसीपेक्षा पाणी धरणात जमा झाले आहे. त्यामुळे पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट कायम स्वरूपी दूर झाले आहे. २६ जुलै नंतरही शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात लागू होणार नाही, वर्षभर नियमीत पाणी पुरवठा केला जाईल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले आहे.

जून महिन्यात पावसाने पुणे शहर व खडकवासला धरण प्रकल्पाकडे पाठ फिरवली. त्यामुळे धरणात केवळ २.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. महापालिकेकडून रोज १६०० एमएलडी पाणी धरणातून उचलले जात होते व पाऊस लांबणीवर पडल्याने पाणीसाठा झपाट्याने खाली जात होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने पाण्याचा काटकसरीने वापर करा असे पत्र महापालिकेला पाठवले. यापार्श्‍वभूमीवर महापालिकेने ४ जुलै ते ११ जुलै या दरम्यान एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पावसाला सुरवात झाली.त्यामुळे महापालिकेने ही पाणी कपात ८ जुलै रोजी मागे घेऊन २६ जुलैपर्यंत नियमीत पाणी पुरवठा केला जाईल. २६ जुलैनंतर धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पुढील नियोजन केले जाईल असे स्पष्ट केले होते.

पाणी पुरवठा विभागाने आज (ता. २२) धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेतला. त्यामध्ये खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत या चारीही धरणात मिळून २०.०३ टीएमसी म्हणजे ६८.७३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी १४.२३ टीएमसी पाणी होते. पुढील वर्षभर पुणे शहराला पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाल्याने व आखणी अडीच महिने पावसाळा असल्याने महापालिकेने पाणी कपात कायमची मागे घेतली आहे. पुढील वर्षभर नियमीत पाणी पुरवठा होणार आहे, असे पावसकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com