पाणीकपात हिवाळ्यात की उन्हाळ्यात? (व्हिडिओ)

पाणीकपात हिवाळ्यात की उन्हाळ्यात? (व्हिडिओ)

पिंपरी - पवना धरणात पाणीसाठा कमी असल्याने येत्या आठ महिन्यांत शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याची सूचना जलसंपदा विभागाने केली आहे. त्यामुळे पाणीकपात हिवाळ्यात करायची की उन्हाळ्यात, याचा निर्णय महापालिकेला घ्यावयाचा आहे. त्याचा आराखडा पदाधिकारी व गटनेते यांना गुरुवार (ता. २२) रोजी सादर करून त्यांच्या मान्यतेने पाणीकपात कशा पद्धतीने करायची, याचा निर्णय महापालिका प्रशासन घेणार आहे.

गणेशोत्सवानंतर नवरात्रीपर्यंत शहरात पाणीटंचाईची समस्या जाणवली. पावसाळ्यानंतर लगेचच उद्‌भवलेल्या या समस्येने नागरिकांत तीव्र नाराजी उमटली. नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने पाणीकपात करण्याऐवजी नेहमीपेक्षाही रोज दहा ते पंधरा दशलक्ष लिटर (एमएलडी) जादा पाणी घेतले. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. दिवाळी व नंतरच्या काळात पाणीटंचाईच्या तक्रारी कमी झाल्या. 

आराखडा कसा करणार?
निम्म्या शहरात मानांकापेक्षा म्हणजे प्रतिव्यक्ती १३५ लिटरपेक्षा कमी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे शहरातील एका भागात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद करून वाचलेले १४ टक्के पाणी शहराच्या अन्य भागात देण्याचे पाणीपुरवठा विभागाचे नियोजन आहे. मात्र, बंधाऱ्यापासून रोजच्या इतकेच पाणी घेतले जाईल. दहा टक्के कपात करायची असल्याने पालिका त्याचा आराखडा कसा करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.   

रावेत बंधाऱ्याजवळ महापालिकेच्या पंपिंग स्टेशनद्वारे सध्या ४८० ते ४९५ एमएलडी पाणी घेतले जाते. दोन महिन्यांपूर्वी ते ४७० ते ४८० एमएलडीच्या दरम्यान होते. जलसंपदा विभागाने ४४० एमएलडी पाणी घेण्यास सांगितले आहे. त्यांच्या या निर्णयावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत चार ऑक्‍टोबर रोजी शिक्कामोर्तब झाले. त्यानंतरही महापालिका जादा पाणी घेत आहे. त्याची भरपाई त्यांना पुढील पावसाळ्यापूर्वी कपात वाढवून करावी लागेल.

पवना धरणाचे उपअभियंता नानासाहेब मठकरी म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीपेक्षा धरणात यंदा सुमारे ११ टक्के कमी पाणीसाठा आहे. १५ ऑक्‍टोबरला गतवर्षीच्या तुलनेत सुमारे ०.६ अब्ज घनफूट (टीएमसी) कमी पाणीसाठा होता. सध्याचा साठा जूनअखेरपर्यंत संपेल. साठा १५ जुलैपर्यंत वापरायचा असतो. त्यामुळे रोज ४४० एमएलडी पाणी घेण्याची सूचना आम्ही केली आहे. सध्या जादा पाणी घेतल्यास उन्हाळ्यात पाणी कपात वाढवावी लागेल.’’

जलसंपदा विभागाने पाणी कपात करण्यास सांगितले आहे. ती कशा पद्धतीने करायची ते आम्ही ठरवीत आहोत. पदाधिकारी व गटनेते यांची २२ नोव्हेंबरला बैठक घेऊन त्यांच्यापुढे पाणी कपात कशी करावयाची त्याचा आराखडा मांडू. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

पवना धरणात पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पाणीकपात केव्हापासून व कशा पद्धतीने करावयाची त्याचा निर्णय महापालिकेने घ्यायचा आहे. आतापासून कपात न केल्यास उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा तोंड द्यावे लागेल. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्याची माहिती दिली, तसेच कालवा समितीचा निर्णय लेखीही कळविला आहे.
- पांडुरंग शेलार,  कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com